पान:सौंदर्यरस.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ही नवनिर्मिती नव्हे !
१३५
 

आजची प्रौढ, नागरी भाषा आहे. त्रिंबकजी डेंगळे, त्याचे गावकरी, त्रिंबकजीची आई, त्याच्या स्त्रिया चंद्रा व मैना, त्यांच्या मोलकरणी- सर्व सर्व प्रौढ नागर भाषा बोलतात. 'आकाशात चंद्र उगवला की पाठोपाठ रोहिणीनं आलंच पाहिजे !' असं चंद्रा म्हणते. हा अलंकार घेऊनच त्रिंबकजी पुढे बोलतो पुढे तिला काही तत्त्वज्ञान सांगताना त्रिंबकजी म्हणतो : 'ब्राह्मणांनी ब्राह्मण्य सोडलं. धन्यांनी धनीपण सोडलं '...'विशेष नेहमीच झालं म्हणजे त्यात वैशिष्ट्य रहात नाही'...'माझ्या भावना दडपल्या जातात' अशी विसाव्या शतकातली प्रौढ भाषा निमगाव जाळीचा, लहानपणी गुरे वळणारा त्रिंबकजी बोलतो. यशवंतराव होळकराच्या आसपासचे लोक सर्व अशीच भाषा बोलतात. तुळसा, लाडी, मावशी या नागर पुणेरी भाषा बोलतात. होळकर घराण्यातले बहुतेक लोक पिढ्यान् पिढ्या इंदूरला राहिलेले. त्यांचे नोकरचाकर तसेच धर्मा, शामराव, भवानीशंकर हे तिकडचेच लोक. पण त्यांची भाषा पुणेरीच आहे. शहरी भाषा आणि खेड्यातली कुणबाऊ भाषा असा फरक दाखविण्याची दक्षताही लेखकांनी घेतलेली नाही. रणजित देसायांनी प्रौढ ब्राह्मणी भाषा कुळंबाऊ भाषा हा भेद लक्षात ठेवून तशातशा व्यक्तींच्या मूखी ती ती भाषा घातली आहे. पण एवढेच. शहर- खेडेभेद, प्रांतभेद, वर्गभेद इत्यादी भेद संभाळावयाचा त्यांनी कटाक्षाने प्रयत्न केलेला नाही. आणि व्यक्तिविशिष्ट भेदाकडे तर कोणीच लक्ष दिलेले नाही. 'सूर्यमंडळ भेदिले', 'घटकेत रोवले झेंडे', 'चंबळेच्या पलिकडे' या सगळ्या कादंबऱ्यांत भाषाविशेषांची अशीच अक्षम्य उपेक्षा केलेली दिसते. 'त्याला तुम्ही अपमानित केले'... 'यामुळे गुण धोक्यात येतात'... 'तुम्ही जाऊ शकता'... 'हा धोरणीपणा की निष्क्रियता ?'... 'शिद्यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव दरबारात आला'... 'मला त्यांनी प्रलोभने दाखविली'... 'अन्यायाला विजय मिळाला की उन्मादाला भरतं येतं'... असली वाक्ये मल्हारराव, महादजी, इब्राहीमखान, भाऊसाहेब यांच्या तोंडी आहेत. भाषाविशेषांची दखल घेतली नाही की व्यक्तिदर्शन चांगले होत नाही, आणि वातावरणनिर्मितीही होत नाही.
 भाषाविशेषांची दखल घेतली तर कोणते आगळे सौंदर्य निर्माण होते हे गो. नि. दांडेकर यांनी आपल्या 'दर्याभवानी' या कादंबरीत दाखवून