पान:सौंदर्यरस.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४
सौंदर्यरस
 

माध्यमातून. आणि एक नवी कल्पित सृष्टी निर्माण करून या दोन जमातींच्या हाडवैराचे भयानक स्वरूप त्याने अतीव कौशल्याने चित्रिले आहे. शिवाय आयव्हॅनहो व स्वतः राजा रिचर्ड या व्यक्तीभोवती फार मोठे रहस्य निर्माण करून ते मोठ्या कौशल्याने शेवटपर्यंत टिकवून स्कॉटने हे निवेदन अत्यंत रम्य व रसाळ करून टाकले आहे. त्याचेच अनुकरण करून हरिभाऊंनी 'रूपनगरची राजकन्या', 'चंद्रगुप्त', 'उषःकाल', 'सूर्यग्रहण' या कादंबऱ्यांना चित्तवेधकता प्राप्त करून दिली आहे. पण आधुनिक कादंबरीकार निवेदनशैलीचा हा महत्त्वाचा घटकही त्याज्य मानतात. त्यांना त्याचे अगदी वावडे आहे असे दिसते. याचे कारण काय ते त्याचे त्यांनाच माहीत ! वास्तविक रहस्यमय घटना- आणि विशेषतः राजकीय क्षेत्रात- या आजही अगदी वास्तव घटना आहेत. प्रत्यक्ष युद्ध व थंडे युद्ध याचे ते एक अविभाज्य अंग आहे. जीवनातले ते अगदी अपरिहार्य सत्य आहे. मागल्या इतिहासात तर रहस्यमय घटना या आजच्या दसपट वास्तव होत्या तरी नवे लेखक त्यांचा मुळीच अवलंब करीत नाहीत याचे आश्चर्य वाटते. ती पद्धती जुनी झाली, शिळी झाली, ती आपण स्वीकारली तर आपल्याला लोक आधुनिक म्हणणार नाहीत, 'जुनेपुराणे' असा शिक्का आपल्यावर मारतील, अशी त्यांना भीती वाटत असावी असे दिसते. किंवा ऐतिहासिक कादंबरी या वाङ्मयप्रकाराविषयीच त्यांच्या काही विकृत कल्पना याच्या बुडाशी असाव्यात. जास्तीत जास्त ऐतिहासिक सत्याच्या जवळ रहावयाचे; कल्पिताचा आश्रय शक्यतो करावयाचा नाही. या विचारामुळेच, साहित्याचे अलंकार शक्यतो वर्ज्य मानावयाचे, अशी त्यांची विचारसरणी असल्याचे त्यांच्या लिखाणावरून दिसते. त्यांच्या कादंबऱ्या बेचव, नीरस, साहित्यशून्य रसाळ झाल्या आहेत, त्याचे हेच प्रधान कारण आहे असे वाटते. कल्पित सृष्टी, नवनिर्मिती हे साहित्याचे मुख्य कार्य होय. आधुनिक कादंबरीला त्याचेच वावडे आहे.
 आधुनिक ऐतिहासिक मराठी कादंबरीच्या भाषाशैलीचा विचार केला तरी, साहित्यसौंदर्याशी मुद्दाम वाकडे धरावयाचे धोरणच नव्या लेखकांनी बुद्धिपुरस्सर आखले आहे की काय, अशी शंका येते. या कादंबऱ्यांत विपुल संवाद आहेत. पण त्यात बोलणारे माणसांची भाषा बहुतेक सर्वत्र