पान:सौंदर्यरस.pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्यरस
 

न्यास, मुद्रेवरील भाव, हे सर्व हावभाव त्या त्या हेतूला साजतील असे केले जातान संगीताचे स्वरही तसेच निघत असतात आणि हे सर्व मिळून हा वामनावतार, ही भस्मासुर मोहिनी, हे शिव-पार्वती असा ठसा आपल्या मनावर उमटतो. मुद्रेवरील भाव, पदन्यास, संगीताचे स्वर, या सर्वांची वमन या कल्पनेशी सुसंगती असणं अवश्य असते. ती साधली तरच ती रचना झाली प्रेक्षकांना खरा आनंद या सुसंगतीमुळे मिळतो. यात कोठेही विसंगती आली की सर्व विरस होतो पार्वतीचे प्रियाराधन करताना शंकराच्या भूमिकेतील शकर कुटी नटराजाच्या पवित्र्यात उभे राहिले. ते उजव्या पावलावर उभे होते डावा पाय त्यांनी वर मोडून धरला होता. आणि छातीसमोर बाहूंच्या आकर्षक मुद्रा त्यांनी केल्या होत्या जटा, व्याघ्रांबर, भस्म हा त्यांचा पेहराव होता. त्यांच्या डोळ्यांतून शृंगार भाव ओसंडत होता. मधेच ते अगदी निश्चल उभे रहात, मधेच एका पायावर गिरकी घेत. शेवटी नृत्याचा समारोप करताना पार्वतीच्या कमरेभोवती विळखा घालून नाचत नाचत ते अंतर्धान पावले ! यातील प्रत्येक घटक 'शिवाने केलेले प्रियाराधन' या कल्पनेशी सुसंगत असाच आहे. सर्वं घटकांचा असा हेतूच्या दृष्टीने सुसंवाद जमला की कलेचा अवतार होतो. सुसंगती, सुसंवाद, सुश्लिष्ट संधिबंध हा कलेचा आत्मा आहे.
 प्रत्येक कलाकृतीच्या मागे काही निश्चित हेतू असतोच. रविवर्मा यांना उर्वशी दाखवावयाची आहे. लिओनार्डो डि व्हिन्सी यांना मोना लिसा मूर्त करावयाची आहे ठाकूर यांना मनोभंग झालेली प्रणयिनी उभी करावयाची आहे वेरूळ- अजंठ्याच्या शिल्पकारांना बुद्ध, शिवतांडव, इराणच्या शहाचा वकील, रावणवध ही निर्मिती करावयाची आहे. बालगंधर्व यांना रुक्मिणी, सिंधू, शकुंतला, मेनका यांना प्रत्यक्षात आणावयाचे आहे. केसरबाईंना मियामल्हार, परज, काफी कानडा, कौशी कानडा हे राग आळवावयाचे आहेत. प्रत्येक कलाकाराचा हेतू आधी असा निश्चित झालेला असतो. आणि त्या हेतूच्या सिद्धीसाठी भिन्न रंग भिन्न शिळा, भिन्न भाव, भिन्न स्वरालाप यांची बांधणी तो करतो. म्हणजे ही बांधणी, हा रूपाकार, हा सन्निवेश साभिप्राय असतो. अर्थसंपन्न असतो असा अर्थसंपन्न सन्निवेश, असा साभिप्राय संधिबंध म्हणजेच कलाकृती.