पान:सौंदर्यरस.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ही नवनिर्मिती नव्हे !
१३३
 

टाळतात. इतिहासातील वर्णनांत बखरीतल्या वर्णनांची भर घालून नवे लेखक ऐतिहासिक घटना एकापुढे एक जोडून देतात, आशि त्यालाच कादंबरी म्हणतात.
 'उत्तम ऐतिहासिक कादंबरी कोणती-- जिच्यात किमान इतिहास आहे ती,' असे अँडर मॅथूज या समीक्षकाने म्हटले आहे. 'सत्य आणि सत्याभास यांचे मिश्रण हे ऐतिहासिक कादंबरीचे हृद्गत होय,' असे हरिभाऊ म्हणतात. वास्तव आणि कल्पित-- फॅक्ट आणि फिक्शन-- यांच्या संयोगातून ऐतिहासिक कादंबरी निर्माण होते, असे अनेक साहित्यशास्त्रज्ञांचे मत आहे. आणि मानवी मनाचे धर्म जोपर्यंत बदललेले नाहीत तोपर्यंत हे, निकष बदलता येणार नाहीत. ही जुनी मते झाली, आता ती शिळी झाली असे म्हणून कोणाला समाधान मानून घ्यावयाचे असले तर त्याने घ्यावे. पण मनुष्याच्या मनाचे घटक जोपर्यंत शिळे होत नाहीत तोपर्यंत त्या समाधानाला अर्थ नाही. त्या मनाला कल्पित सृष्टी हवी आहे; जीवनातल्या घडामोडीमागचे रागद्वेष हवे आहेत; अमूर्त नको असून मूर्त हवे आहे; सार्वजनिक नको असून वैयक्तिक, कौटुंबिक हवे आहे; ज्ञान नको असून भावना हव्या आहेत; इतिहास नको, कल्पित हवे आहे.
 निवेदनशैलीच्या दृष्टीने रसक्रमाला जसे महत्त्व आहे तसेच रहस्य या घटकालाही आहे. मानवी मनाला शृंगार, समर, करुण यांची जशी ओढ आहे, तशीच रहस्य जाणून घेण्याची आहे. गुप्तहेरकथा, गुप्तचरकथा यांचा तर रहस्य हा आत्माच आहे. ऐतिहासिक कादंबरीत रहस्याला इतके जरी नाही तरी खूपच महत्त्व आहे, हे पूर्वीच्या कादंबऱ्यांवरून सहज दिसून येईल. वॉल्टर स्कॉट हा इंग्लंडमधला पहिला ऐतिहासिक कादंबरीकार मानला जातो, त्याने आपल्या निवेदनात रहस्याचा मोठ्या चातुर्याने उपयोग केलेला आहे. 'आयव्हॅनहो' ही त्याची कादंबरी पाहा. आतापर्यंत सांगितलेल्या साहित्याच्या सर्व निकषांअन्वये ती उत्तम ऐतिहासिक कादंबरी ठरते. नॉर्मन व सॅक्सन या मध्ययुगीन इंग्लंडमधल्या दोन जमाती असून त्यांचे हाडवैर होते. हा व्यापक, सार्वजनिक विषय स्कॉटने निवडला आहे. पण तो मांडला आहे आयव्हॅनहो व रोवेना यांच्या वैयक्तिक जीवनाच्य