पान:सौंदर्यरस.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२
सौंदर्यरस
 

आपल्या मनात प्रथम निर्माण करून मगच डिकन्स ती हकीकत सांगतो. परमार्थामध्येसुद्धा प्रथम जिज्ञासाजागृती असते. 'अथा तो ब्रह्मजिज्ञासा' हे पहिले सूत्र. त्यावाचून पुढे पाऊल नाही. मग साहित्यात तरी त्यावाचून केलेले निवेदन रंजन करण्यास कसे समर्थ होईल ? पण आधुनिक कादंबरीत कथानकाप्रमाणेच निवेदनातील रसक्रमही निषिद्ध मानलेला दिसतो. सर्व लेखक पहिलीनंतर दुसरी, दुसरीनंतर तिसरी, मग चौथी, मग पाचवी, मग दहावी, मग शंभराची, असा रूक्ष कालक्रमाचाच आश्रय करतात.
 'घटकेत रोविले झेंडे' ही कादंबरी म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांचे विस्तृत असे चरित्रच आहे. मांडवगडची लढाई, बुंदेलखंडची लढाई, दक्षिणेतील छत्रपती शाहू व संभाजीराजे यांच्यातील वैमनस्य, उदाजी चव्हाणाचे पारिपत्य, बाजीरावसाहेबांची दिल्लीवर स्वारी, भोपाळचा वेढा, अशा क्रमाने हे सगळे निवेदन केलेले आहे. त्यात कथानक नाही, वैयक्तिक जीवन नाही, मानवी भावनांतून आळविलेले रस नाहीत, श्वास रोखून वाचावे असे समरप्रसंग नाहीत. लढायाच आहेत. तेव्हा समरप्रसंग आलेच. पण त्यांची ती ऐतिहासिक वर्णने आहेत. थोडा तपशील जास्त भरला आहे इतकेच, पण किल्ले सुलतानगड किंवा सिंहगड या एकेका युद्धाभोवती मानवी मनातल्या रसगंगा जशा हरिभाऊंनी वाहविल्या आहेत तशा येथे नाहीत. त्यामुळे त्या लढाया, ती युद्धे म्हणजे साहित्यातील समरप्रसंग होत नाहीत.
 साहित्य ही नवी आहे. 'घटकेत रोविले झेंडे' या कादंबरीच्या बाराशे पानात नवनिर्मितीचा कुठेच आढळ होत नाही. ऐतिहासिक घडामोडींचे ज्ञान व्हावे म्हणून कोणी कादंबरी वाचीत नाही. या घडामोडींच्या मागचे जे मानवाचे शाश्वत मनोविकार, त्यातून उद्भवणारे भावनाक्षोभ, भिन्न भावनांचा तुमुल संगर, हे पहावे आणि त्यांची अनुभूती घडावी म्हणून वाचक कादंबरी हाती घेतो, पण कालक्रमाने केलेले निवेदन, भाववर्णनांचा अभाव, ज्ञान देणारी ऐतिहासिक घटनांची तपशीलवार वर्णने यांनी त्याचा तो हेतू साध्य होत नाही, नवनिर्मितीवाचून अनुभूती घडत नाही. आणि बहुतेक आधुनिक कादंबऱ्या नवनिर्मिती करण्याचे कटाक्षाने