पान:सौंदर्यरस.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ही नवनिर्मिती नव्हे !
१३१
 

नाहीत. वास्तविक या प्रत्येक प्रसंगात एका स्वतंत्र कादंबरीला पुरेल असा संघर्ष आहे. असा रसनिर्झर आहे. पण तो फुलविला, आळविला तर साहित्य निर्माण होते. पण देसायांनी एखादी जंत्री करावी तसे ते प्रसंग टाचून जोडून आपल्यापुढे मांडले आहेत. पोत्यात सामान भरावे तसे हे प्रसंग पुस्तकाच्या दोन पुठ्ठ्यात भरले आहेत. त्यामुळे ते निवेदन नीरस, बेचव आणि रटाळ झाले आहे. एकसंध अखंड समरकथा तर त्यात नाहीच; पण 'स्वामी'- सारखा प्रत्येक प्रसंग संघर्षाने वा मधुर शृंगाराने वा कारुण्याने नटलेलाही नाही, शिवचरित्र ही महाराष्ट्राची स्फूर्ती आहे, विद्युत् आहे, संजीवनी आहे. नवरस मंदाकिनी आहे, ती कथा इतकी रूक्ष, रसशून्य व ओसाड कोणी करू शकेल यावर मी कधीच विश्वास ठेवला नसता. आणि 'स्वामी' कर्ते रणजित देसाई असे लिहू शकतील हे तर ती वाचल्यावरही खरे मानण्यास प्रयास पडतात.
 निवेदन- शैलीचा विचार केला तरी असे दिसते की, या लेखकांनी साहित्यनिर्मितीचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही. रसोत्कट प्रसंग जो असेल तेथून प्रारंभ करावा, तो धागा प्रथम खेचून घेऊन त्याच्याबरोबरच वाचकांची मने खेचून घ्यावी, त्यांचे औत्सुक्य जागृत करावे, त्यांच्या ठायी उत्कंठा निर्माण करावी, ही ऐतिहासिक कादंबरीच्या निवेदन- शैलीतली प्राथमिक गोष्ट आहे. कमलकुमारी सती जात होती, तिला उदयभानूने पकडले, हा प्रसंग हरिभाऊ प्रथम सांगतात. 'उषःकाला'त रंभावतीची कथा त्यांनी कशी सांगितली आहे ? तिला पळवून नेली तेथून त्यांनी आरंभ केला नाही. हा कालक्रम झाला. पण नाट्यमयता आणण्यासाठी रसक्रमाने निवेदन करणेच अवश्य असते. रंभावतीला तिच्या महालात गुप्तपणे येऊन रामराव भेटतात व 'मरायला सिद्ध हो !' असे म्हणतात, त्या प्रसंगापासून हरिभाऊ प्रारंभ करतात. हा रसक्रम होय. यानंतर उत्कंठा जागृतीचे धोरण ठेवून कधी मागले, कधी पुढले प्रसंग हरिभाऊ सांगतात.
 डॉ. मॅनेट यांच्यावर एव्हरमाँड सरदारांनी जे भयानक अत्याचार केले त्याचे वर्णन डिकन्सने प्रारंभी केले नाही. कादंबरीच्या प्रारंभाच्या आधीची किती तरी वर्षांपूर्वीची ती कथा होती. पण ती जाणण्याचे औत्सुक्य