पान:सौंदर्यरस.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
सौंदर्यरस
 

करतो. साहित्यसृष्टी कधी निर्माण करतो. ती कल्पित असते. पण असत्य नसते. उलट एका टीकाकाराने म्हटल्याप्रमाणे जास्तच सत्य असते. पण ती केव्हा ? सजीव वनस्पतीप्रमाणे एका बीजातून ती विकसत आली तर. हा विकास म्हणजेच कथानक आधुनिक ऐतिहासिक कादंबरी तेच कटाक्षाने करीत नाही. त्यामुळे ती नवनिर्मिती होत नाही. ईश्वराच्या सृष्टीतलेच तुकडे घेऊन हे लेखक त्यांना शिवण घालतात. त्यामुळे ते पहाताना नवनिर्मिती पाहिल्याचा आनंद होत नाही.
 कथा म्हणजे समरप्रसंग. लेखकाने तो फुलविला की त्यातून मानवाचे रागद्वेष, मदमत्सर, हर्षखेद, भक्ती, प्रीती, धैर्य, सूडबुद्धी, स्वार्थलोभ, अर्पणवृत्ती इत्यादी विकार- भावना प्रकट होतात. आणि त्यांनीच कथा आकर्षक होते. 'स्वामी' कादंबरीत सलग एकसंध कथानक नाही. प्रारंभापासून अखेरपर्यंत एकच एक अखंड धागा नाही. पण देसाई यांनी निवेदन करताना समरप्रसंगांनीच मालिका गुंफण्याचे धोरण कटाक्षाने ठेविले आहे. पहिल्याच प्रवेशात दरबारात दिनकर महादेव उभा रहातो व जवहिरखान्यातून दिलेल्या डागांच्या पावत्या मिळत नाहीत अशी तक्रार मांडतो. ती अर्थातच राघो यांच्या विरुद्ध होती. त्यामुळे ते संतापले. तरीही पावत्या दिल्याच पाहिजेत असा माधवरावांनी निर्णय दिला. आणि ठिणगी पडली. गंगोबा तात्या, राघोबा व माधवराव यांच्या संदर्भात 'महादेव आणि नंदी' ही उपमा योजतात. ही बारीकशी पण ठिणगीच आहे. विसाजीपंत लेले, सखारामबापू यांचे प्रवेश- त्यात अशाच ठिणग्या आहेत. आणि कादंबरीकार त्या फुलवून त्यातला दाह, त्यातले रागद्वेष चांगले उभे करतो. त्यामुळे 'स्वामी' हे साहित्य झाले आहे.
 उलट 'श्रीमान् योगी' पहा. त्यात सर्व शिवचित्र ठोकून बसविण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. निवड अशी नाहीच. महाराजांनी रांगणा घेतला. साल्हेर घेतला, सुरत लुटली, सिंहगड घेतला- एकापाठोपाठ दैनंदिनीतील नोंद वाचून दाखवावी तशी देसाई हकीकत सांगत आहेत. प्रतापरावाने नेसतीच्या लढाईत आत्महुती दिली, नेताजी पालकर मुसलमान झाला, शिव-समर्थांची भेट झाली, संभाजीराजांनी गोदावरीला पळवून एका गडावर नेऊन ठेवली... निवेदन चालू आहे. त्यात ठिणग्या नाहीत, रसौघ