पान:सौंदर्यरस.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ही नवनिर्मिती नव्हे !
१२९
 

तशीच कवीही अपर सृष्टी निर्माण करतो. आणि ती कथानकाच्या रूपाने दिसून येते. आधुनिक ऐतिहासिक कादंबऱ्यांत ही अपर सृष्टी अभावानेच आढळते.
 कथानक म्हणजे तरी काय ? आरंभापासून अखेरपर्यंत फुलवीत नेलेला, निसर्गक्रमाने विकसत जात असल्याचा भास निर्माण करणारा समरप्रसंग. समरप्रसंगाचा आरंभ म्हणजे कादंबरीचा आरंभ. त्याचा शेवट म्हणजे कादंबरीचा शेवट. 'टेल ऑफ टू सिटीज' ही डिकन्सची कादंबरी पहा. चार्ल्स डार्ने (एव्हरमाँड) व लुसी मॅनेट यांचे परस्परांवर प्रेम जडून त्यांचा विवाह झाला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या बेबंदशाहीत डार्ने पकडला गेला. येथे समरप्रसंग सुरू झाला. आणि मृत्यूच्या दाढेतून सुटून लुसीबरोबर तो फ्रान्समधून इंग्लंडला परत गेला तेव्हा तो संपला, आणि कादंबरीही तेथेच संपली. या दोन सामान्य व्यक्तींच्या कौटुंबिक, खाजगी जीवनातील प्रसंगांतून सर्व फ्रेंच राज्यक्रांतीच्या वादळाचे उत्तम दर्शन आपल्याला घडते. 'फ्रेंच राज्यक्रांतीसारख्या सार्वजनिक घटनेशी सामान्य, खाजगी व्यक्तींच्या जीवनाची इतकी एकजीव केलेली गुंफण मी दुसऱ्या कोठल्याही कथेत पाहिलेली नाही.' असे ई. एम. फॉर्स्टर या प्रख्यात लेखकाने म्हटले आहे. 'उषःकाल' मध्ये हरिभाऊंची कादंबरीकला अशीच प्रकट झाली आहे. मुस्लिमांचे सुलतानी राज्य, त्यांचे अत्याचार व त्याविरुद्ध मराठयांनी केलेली उठावणी यांची ही कथा आहे. नानासाहेब व चंद्राबाई यांचा वियोग झाला येथे समरप्रसंग सुरू होतो, व पुनर्मीलन झाले तेथे तो संपतो. या कादंबरीत आणखी दोन उपकथानके अशीच आहेत, सूर्याजीच्या कुटुंबावर सुलतानी सत्तेचा असाच आघात झाला. त्याची बायको वेडी झाली. तिला पुन्हा शुद्ध येऊन ती सूर्याजीरावांना लाभली, येथे कथा संपली. रामरावांची पत्नी रंभावती हिला विजापूरच्या सुलतानाने पळवून जनानखान्यात घातले. रामरावांनी हे कृत्य करणाऱ्या सादुल्लाखानाला ठार मारून सूड उगविला व मग त्या दोघांनीही इहलोक सोडला. या तीन घराण्यांच्या हकीकतीतून मुस्लिम सत्ता व शिवकृत क्रांती यांचे दर्शन जसे घडते तसे प्रत्यक्ष इतिहासातूनही घडत नाही. यामुळेच कादंबरीला नवी सृष्टी म्हणतात. इतिहाससृष्टी परमेश्वर निर्माण
 सौं. ९