पान:सौंदर्यरस.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
सौंदर्यरस
 

स्वतःजवळचे लाख रुपये तिनेच त्यांना दिले, व सेना उभारण्यास साहाय्य केले. या प्रसंगी तिचे जे वात्सल्य प्रकट होते, यशवंतरावांची तिच्याविषयीची जी भक्ती दिसून येते, त्यावरून कौटुंबिक जीवन, त्यात आविष्कृत होणारे शाश्वत मनोविकार हाच खरा साहित्याचा विषय होय, या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होईल साहित्याचे हे मर्म ज्यांनी जाणले नाही त्यांना कादंबरी- लेखनात, राजकीय घडामोडींतून साहित्य निर्मिण्याच्या कामात यश येणे कठिण आहे.
 वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, त्या जीवनातून आविष्कृत होणारे शाश्वत मनोविकार हे ज्या प्रमाणात कमी किंवा जास्त वर्णिलेले असतात, त्या प्रमाणात त्या कादंबरीचे आकर्षण कमी किंवा जास्त होते. 'स्वामी'- नंतर प्रसिद्ध झालेल्या अनेक कादंबऱ्यांचा निर्देश वर केला आहे वाचकांनी या दृष्टीने त्या वाचून वरील सत्याचा स्वतःच पडताळा घ्यावा.
 पण मानवाचे शाश्वत मनोविकार, त्याच्या शृंगार-वीर करुणादी भावना यांचे प्रभावी वर्णन करावयाचे, तर त्यासाठी बांधेसूद, सुरचित अशा कथानकाची आवश्यकता असते, आणि आधुनिक ऐतिहासिक मराठी कादंबरीने कथानकरचना कटाक्षाने टाळली आहे. त्यामुळे साहित्यकलेची मोठी हानी झाली आहे. हे लेखक एकापुढे एक प्रसंग जोडून एक घटनांची मालिका आपल्यापुढे मांडतात. त्यामुळे कापडाचे निरनिराळे धडपे जोडून बनविलेल्या मधूनमधून आडवे उभे दंड घातलेल्या पासोडी- गोधडीसारख्या या कादंबऱ्या दिसतात. आरंभापासून शेवटपर्यंत अखंड टिकणाऱ्या धाग्यांनी, ताण्या-बाण्यांनी विणलेल्या सलग, एकसंध वस्त्राची शोभा त्यांना येत नाही. या कादंबऱ्यांत निरनिराळे जे धडपे जोडलेले आहेत तेही इतिहासप्रसिद्ध पुरुषांच्या जीवनातले. म्हणजे इतिहासांनी आधीच वर्णिलेले. यामुळे या कादंबऱ्या म्हणजे नवनिर्मिती होत नाही. साहित्य ही नवी सृष्टी असते. नवनिर्मिती असते. जमिनीत पेरलेल्या एका कोयीतून वा बीमधून कोंब येतात, त्याला धुमारे फुटतात, व त्यांचेच हळूहळू वृक्षात वा वेलीत रूपांतर होते. निसर्गात ही जी किमया घडते, तीच कविमनात घडत असते. म्हणूनच त्याला आपण शब्दसृष्टीचा ईश्वर म्हणतो. ईश्वर सृष्टी निर्माण करतो.