पान:सौंदर्यरस.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ही नवनिर्मिती नव्हे !
१२७
 

 काही कादंबरीकारांनी नायक म्हणून माधवराव, यशवंतराव, दुसरा बाजीराव असे प्रसिद्ध ऐतिहासिक पुरुष निवडले असले तरी त्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक जीवन रंगविण्याचे धोरण कटाक्षाने संभाळलेले असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांत रसनिर्मिती झालेली आहे. 'स्वामी' ही कादंबरी अशांमध्ये अग्रस्थानी आहे. रमाबाई आणि माधवराव यांच्यामधले इतके रम्य प्रसंग रणजित देसाई यांनी मधून मधून हिऱ्यासारखे या कादंबरीत बसविले आहेत, की त्यातून नवरस मंदाकिनीच पाझरत असल्याचा भास व्हावा. थेऊरच्या देवळात माधवराव बाहेर दाराशी आले तरी रमाबाई मैत्रिणींशी लपंडाव खेळतच राहिल्या, तो प्रसंग प्रारंभीचा, आणि शेवटचा माधवरावांच्या मृत्यूचा आणि सतीचा. 'स्वामी' या कथेचे साहित्यसुवर्ण झाले आहे ते या व अशा शृंगारवीरकरुणांमुळे. मातुःश्री गोपिकाबाई, काकू पार्वतीबाई यांच्या भेटीगाठीच्या प्रसंगी त्यांचे व माधवरावांचे झालेले अनेक संवाद या पेशव्याच्या अंतरंगाचे चित्रण करतात. आणि ते नाट्यमय प्रसंग वाचकांचे समाराधन करतात.
 ना. स. इनामदार यांच्या 'झुंज' या कादंबरीत यशवंतराव होळकर यांचे व्यक्तिजीवन असेच पहावयास मिळते. तुळसाची व त्यांची पहिली भेट आणि पुढे त्यांचे झालेले लग्न, या घटना जुन्या कादंबरीतल्या कथानक- रचनेचा भास निर्माण करतात. यशवंतराव प्रथम भणंग स्थितीत जेजुरीला आले. त्यांना इंदूरला जाण्यासाठी पैसे हवे होते. गोपाळराव खाडे हे होळकरांचे उपाध्ये. या गरीब ब्राह्मणाने मुलीच्या लग्नासाठी साठवून ठेवलेले चारशे रुपये त्यांना दिले. पुढे पराक्रम करून यशवंतराव परत जेजुरीस आले तेव्हा त्यांना कळले की, गोपाळरावांच्या वेणूचे लग्न झाले. पण हुंड्याचे चारशे रुपये देता न आल्यामुळे सासरच्यांनी मुलीला छळून छळून मारले. आणि त्यामुळे तिची आई वेडी झाली. हे ऐकून यशवंतराव वेडेपिसे झाले. आपल्यामुळे या ब्राह्मणाचा संसार उद्ध्वस्त झाला हे पाहून त्यांना धक्का बसला. याही घटनेला थोडे कथानकाचे रूप आहे. मल्हारराव होळकरांची उपस्त्री मावंशीबाई हिचे यशवंतरावांवर पोटच्या पोरापेक्षा जास्त प्रेम होते. तिनेच त्यांची समजूत घालून तुळसाशी त्यांचे लग्न घडवून आणले. वेळ येताच