पान:सौंदर्यरस.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
सौंदर्यरस
 

कलेची व्याख्या केली आहे. (काँक्रिट युनिव्हर्सल). जर्मन महाकवी गटे यानेही काव्याचे हे लक्षण प्रधान म्हणून सांगितले आहे. 'व्यष्टीतून समष्टीचे विश्वाचे रूप दाखविणे हे काव्याचे सारतत्त्व होय,' असे तो म्हणतो. तेव्हा कादंबरी सामाजिक असो, राजकीय असो, ऐतिहासिक असो- तिची गुंफण व्यक्तीच्या खाजगी भावनात्मक जीवनाभोवतीच झाली पाहिजे. आधुनिक ऐतिहासिक कादंबरीत साहित्याच्या या प्रधान तत्त्वाकडे दुर्लक्ष झालेले आहे. या कादंबऱ्यांचे नायक इतिहासप्रसिद्ध पुरुष आहेत. त्यांच्या जीवनाचे चित्रण करताना त्यांच्या सार्वजनिक राजकीय जीवनाला प्राधान्य येणे अपरिहार्यच आहे. शिवाजी, बाजीराव, नाना फडणीस, महादजी शिंदे यांच्या कार्याच्या वर्णनात तसे प्राधान्य आले नाही तर त्या पुरुषांचे दर्शनच घडणार नाही. पण तसे प्राधान्य येताच साहित्यकलेची हानी होणे हेही अपरिहार्यच आहे.
 'सूर्यमंडळ भेदिले', 'चंबळेच्या पलिकडे', 'घटकेत रोवले झेंडे' या कादंबऱ्या पहा. पानांमागुन पाने, प्रकरणांमागून प्रकरणे उलटावी तरी सदाशिवरावभाऊ, महादजी शिंदे यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनाचे दर्शन घडतच नाही. मराठी फौज व कवायती पलटणी, तोफखान्याचे महत्त्व, गनिमी कावा, उत्तर- हिंदुस्थानातले पठाणांचे राजकारण, दत्ताजीचा वध, पानपतचा व्यूह, रजपुतांची बंडखोरी, महादजीच्या वारशाचा प्रश्न, निजामाची कारस्थाने, याच विषयांच्या वर्णनांनी ही पाने भरलेली आहेत. नानासाहेब मारुतीच्या देवळातील भुयारात उतरला, चंद्राबाई घरातून नाहीशी झाली, यामुळे पुढे काय झाले हे जाणण्याची जी उत्कंठा वाचकांच्या मनांत जागी होते, तशी या कादंबऱ्यांतून केव्हाच होत नाही. कमलकुमारी सती जात असतानाच उदयभानूने तिला पकडले व सिंहगडावर नेऊन तिच्याशी निका लावण्याचे ठरविले, हे वृत्त पहिल्या प्रकरणात वाचताच त्या एका तरुण स्त्रीच्या सुखदुःखाभोवती वाचकाचे लक्ष खेचले जाते व शेवटपर्यंत ते तेथेच खिळून राहते. आणि इतिहासात जरी तानाजी व सिंहगडची लढाई यांना महत्त्व असले तरी कमलकुमारीची विटंबना टळते की नाही याचीच चिंता वाचकांना सारखी वाटत रहाते. अशी काही चिंता, अशी उत्कंठा, ही खेच वरील कादंबऱ्यांत केव्हाही जाणवत नाही. कारण त्यांत वैयक्तिक जीवन आले तरी दर्यामे खसखस या प्रमाणात येते.