पान:सौंदर्यरस.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ही नवनिर्मिती नव्हे !
१२५
 

मुळेच साहित्याने मनोरंजन होते. लोकांना त्यात गोडी वाटते. भिन्नरुची जनांचे समाराधन करण्याचे सामर्थ्य साहित्याला या सौंदर्यतत्त्वामुळेच येते, आणि वैयक्तिक जीवन, त्या जीवनातल्या शाश्वत भावना, शाश्वत विकार हा सौंदर्यतत्त्वाचा पहिला घटक आहे.
 याचा अर्थ असा नव्हे की, सामाजिक, सार्वजनिक जीवन हे साहित्याला वर्ज्य आहे. तसे मुळीच नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की, त्या त्या काळचे सामाजिक, वा राजकीय वा धार्मिक जीवनाचे चित्रण करावे असाच बहुधा थोर साहित्यिकाचा, कवीचा, नाटककाराचा, कादंबरीकारांचा हेतू असतो. ते उद्दिष्ट मनापुढे ठेवूनच तो काव्य- कादंबरी लिहायला बसतो. पण असे जरी असले तरी वैयक्तिक जीवनाच्या माध्यमातूनच म्हणजे व्यक्तीच्या विकारांच्या, भावनांच्या माध्यमांतूनच त्याने सार्वजनिक जीवनाचे दर्शन घडवावयाचे असते. त्याने असे केले तरच त्या वाङ्मयाला साहित्याची पदवी प्राप्त होते.
 वर निर्देशिलेल्या ज्या अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांच्या लेखकांना या साहित्याच्या प्रधान लक्षणाचा विसर पडला आहे असे वाटते. एक तर सर्वांनी शिवछत्रपती, थोरले बाजीराव, सदाशिवरावभाऊ, माधवराव पेशवे, नाना फडणीस. त्रिंबकजी डेंगळे, यशवंतराव होळकर, दुसरा बाजीराव, अशा इतिहासकाळातल्या सार्वजनिक क्षेत्रात अग्रभागी असलेल्या व्यक्तींनाच नायकपद दिलेले आहे. हरिभाऊंच्या 'उषःकाल' या कादंबरीत नानासाहेब या काल्पनिक व्यक्तीला नायकपद देऊन सर्व कथा रचलेली आहे. 'उषःकाल' ही नानासाहेब व चंद्राबाई यांची कथा आहे. त्या काळच्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबावर जे दारुण आघात झाले, त्यामुळे त्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या सुखदुःखाचे, भावभावनांचे, रागद्वेषाचे जे आविष्कार झाले, त्यांचे चित्रण हा उषःकालचा विषय आहे. आणि या वैयक्तिक भावनांच्या चित्रणातून हरिभाऊंनी त्या काळच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक जीवनाचे सम्यक् दर्शन घडविले आहे. कादंबरी-कला ती हीच.
 'मूर्तरूप पावलेले तत्त्व, विशेषरूपास आलेले सामान्य, किंवा व्यक्तिरूप पावलेली व्यापकता म्हणजे कला' अशी हेगेल या जर्मन पंडिताने