पान:सौंदर्यरस.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
सौंदर्यरस
 

कादंबरीला ते लाभले आहे. 'श्रीमान योगी' या कादंबरीची किंमत साठ रुपये असूनही तिच्या आतापर्यंत आठ-दहा हजार प्रती खपल्या आहेत. ना. स. इनामदारांच्या 'झेप', 'झुंज' या कादंबऱ्यांच्या अगदी वरील प्रमाणात नसल्या तरी अशाच आवृत्त्या निघत आहेत. कॅप्टन बेलवलकर यांच्या 'घटकेत रोविले शेंडे' व 'शर्तीने राज्य राखिले', देसाई यांची 'चंबळेच्या पलिकडे' मोकाशी यांची 'सूर्यमंडळ भेदिले' यांनाही कमी- जास्त प्रमाणात अशीच प्रसिद्धी लाभली आहे.
 असे असूनही अनेक टीकाकार या नव्या ऐतिहासिक कादंबरीवर असावे तसे प्रसन्न नाहीत. कोणाच्या मते या कादंबऱ्या ऐतिहासिक नाहीतच. लेखकांनी आपल्या कल्पनेनेच आपल्या आवडत्या व्यक्तीची चित्रे रंगविली आहेत. कोणाच्या मते त्यात साहित्यगुण नाहीत. लालित्य, रमणीयता यांचा त्यांत अभाव आहे. 'मंत्रावेगळा' या कादंबरीच्या संदर्भात ना. ग. गोरे यांनी म्हटले आहे की, "या तथाकथित आधुनिक ऐतिहासिक कादंबऱ्यांची श्रेणी पुराणापेक्षा वरची मानता येणार नाही." 'श्रीमान योगी' या कादंबरीचा खप पुष्कळ झाला. पण तिला 'स्वामी'ची प्रतिष्ठा लाभली नाही. आणि तिचा विषय 'स्वामी'पेक्षा मोठा असूनही ती लाभली नाही हे लक्षणीय आहे. वृत्तपत्रांत या कादंबरीची परीक्षणे आली तेव्हा परीक्षकांनी बराच हात राखून तिचा गौरव केला होता. इतर कादंबऱ्यांची वार्ता अशीच आहे.
 अशा स्थितीत या नव्या ऐतिहासिक कादंबरीचे, अभिजात, विदग्ध अक्षर साहित्याचे काही निकष ठरवून त्याअन्वये मूल्यमापन करणे अगत्याचे आहे. या लेखाचा तोच हेतू आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीची जन्मशताद्वी त्यातच अनायासे साजरी होईल.
 वैयक्तिक जीवन, व्यक्तीचे खाजगी कौटुंबिक जीवन हा ललित साहित्याचा विषय असतो. आणि तसाच तो असला पाहिजे. कारण बहुजनांना रस त्यांतच असतो; सामाजिक, सार्वजनिक, जीवनात नव्हे. मानवाच्या मनातले रागद्वेष, असूया, मद, मत्सर, लोभ, दंभ, काम, क्रोध हे सर्व विकार, भक्ती, अमर्ष, करुणा इत्यादि भावना यांचे वर्णन, यांचे चित्रण हे साहित्याचे कार्य होय. सौंदर्यतत्त्व हा साहित्याचा आत्मा होय. या सौंदर्या-