पान:सौंदर्यरस.pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्यरस
 

 ताजमहाल या अमर कलाकृतीचा विचार केला तर ही कल्पना जास्तच स्पष्ट होईल. त्याला वापरलेले संगमरवरी दगड, त्याच्या केलेल्या चौकोनी फरश्या, या साधनसामग्रीत नवीन काही नव्हते. पण त्या सर्व संगमरवरी शिळांचा जो न्यास कलाकाराने केला त्यांतून नावीन्य आणि सौंदर्य निर्माण झाले. येथे सर्व शिल्पकला एकवटली आहे, सौंदर्याची सीमा झाली आहे. पाचही खंडांतून ते सौंदर्य पहाण्यास लोक येतात. दर वेळेस त्यातून नवीन सौंदर्याचा साक्षात्कार होतो, असे ताजमहालाचे वर्णन कवी करतात. सुट्या संगमरवरी शिळा पाहून असा आनंद कोणाला झाला असता काय ? अर्थातच नाही. मग या सौंदर्याचा आत्मा कशात आहे ? त्या विशिष्ट न्यासात, संधिबंधात, सन्निवेशात तो आहे, याविषयी दुमत होईल असे वाटत नाही.

 'रचना' हा शब्द वर अनेक वेळा वापरला आहे. त्याचा अर्थ जरा स्पष्ट करणे अवश्य आहे. 'रचना' हा शब्द वापरताना त्या रचनेचा कर्ता आणि त्या कर्त्याच्या मनातील ती रचना करण्यामागचा हेतू या दोन गोष्टी गृहीत धरल्या आहेत. एरवी त्या शब्दाला काहीच अर्थ रहाणार नाही. माळीबुवांच्या समोर फुलांच्या राशी पडलेल्या असतात. फुलांचे हार होतात, वेण्या होतात, गुच्छ बांधले जातात किंवा गालिचेही होतात. यातले आपण काय करावयाचे म्हणजे रचनेचा हेतू काय, हे माळ्याच्या म्हणजे कर्त्याच्या मनात आधी निश्चित होते आणि मग तो कामाला लागतो. हार हा हेतू असेल तर एक प्रकारचा फुलांचा सन्निवेश, गुच्छ असेल तर वेगळा, आणि गालिचा असेल तर तिसराच प्रकार. आणि कर्त्याच्या मनातल्या हेतूप्रमाणे फुलांची जुळणी झाली तरच तिला रचना म्हणावयाचे. नाही तर तो फुलांचा केवळ समूह झाला. त्यात कला नाही व सौंदर्यही नाही. तेव्हा रचना याचा अर्थ विशिष्ट हेतूने केलेली मांडणी, असा दर ठिकाणी अभिप्रेत आहे. प्रसिद्ध नर्तक शंकर कुटी यांच्या नृत्याचे एका रसिकाने केलेले वर्णन पहा. वामनावतार दाखवावयाचा, किंवा भस्सासुर- मोहिनीचे कथानक मूर्त करावयाचे, किंवा शिवपार्वती नृत्य करावयाचे हे त्यांच्या मनात आधी ठरते. आणि मग जिवणीच्या, भ्रुकुटीच्या, खांदे, मान यांच्या हालचाली, पदांचे