पान:सौंदर्यरस.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






ही नवनिर्मिती नव्हे !



 मराठी ऐतिहासिक कादंबरीचा जन्म बरोबर शंभर वर्षांपूर्वी झाला. १८७१ साली गुंजीकर यांनी 'मोचनगड' ही पहिली ऐतिहासिक कादंबरी लिहिली. त्यानंतर हरिभाऊंचा लवकरच उदय झाला व त्यांनी मराठी ऐतिहासिक कादंबरीला थोर प्रतिष्ठा मिळवून दिली. पुढल्या तीस-चाळीस वर्षात ना. ह. आपटे, नाथमाधव, हडप या लेखकांनी या क्षेत्रात विपुल प्रमाणात लेखन केले. त्यांच्या साहित्याला लोकप्रियताही खूप लाभली. पण तरीही हरिभाऊंचे स्थान अद्वितीयच राहिले. त्या उंचीला अन्य कोणी कादंबरीकार पोचू शकले नाहीत, असाच मराठी टीकाकारांचा अभिप्राय सामान्यतः होता.

 यामुळेच किंवा अन्य काही कारणांनी असेल, पण पुढच्या काळात हा वाङ्मयप्रकार जरा मागे पडला. १९६० च्या आधींच्या वीस-पंचवीस वर्षांत चांगली लोकप्रिय अशी ऐतिहासिक कादंबरी लिहिली गेली नाही. पण थोडयाच दिवसांत रणजित देसाई यांची 'स्वामी' ही कादंबरी प्रसिद्ध झाली, आणि ऐतिहासिक कादंबरीला पुन्हा ऊर्जितावस्था आली. ती इतकी की सध्या ती कादंबरी प्रसिद्धीच्या व लोकप्रियतेच्या अगदी शिखरावर आरूढ झाली आहे असे दिसते. मराठीत २५००० प्रती खपण्याचे भाग्य एखाद्या कादंबरीला पूर्वी कधी मिळाले असेल असे वाटत नाही. 'स्वामी'