पान:सौंदर्यरस.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
सौंदर्यरस
 

कस्तुरा ?' त्यो रुस्तुमराव अन् तो चापेगडचा किल्लेदार दिसल्यापून माजा डोळा लवलवतोया. माजा जीव काळजीनं उडून गेलाया !' 'येडी का काय तू ? म्या तुज्यापाशी असताना आन तुज्यामाज्यावर आपल्या राजाची सावली असताना तुला कोन हात लावील ? आपुन रानची पाखरं. भ्या धरून जगायचं व्हय ग ? आपला राजा गरुड हाय अन आपुन त्येची पिल्लं आहू. त्येला सोभंसं वागावं मानसानं!'
 शिवछत्रपतीचे मोठाले पराक्रम इतिहासात वर्णिलेले असतात. पण सामान्य जनतेच्या मनीमानसी त्यांचे कोणते रूप साठविलेले असते ते इतिहास सांगत नाही. ते सांगणे हे लघुकथेचे काम आहे. 'मी शिवाजीमहाराजांचा तांडेल आहे, तेव्हा तू भिऊ नको' असे त्या खलाशाने यशोदेला आश्वासन दिले, आणि तिला तो धर्माची भैण म्हणाला, 'राजाची सावली आपल्यावर आहे; तेव्हा तुला कोन हात लावील' असे आश्वासन सर्जाने कस्तुराला दिले. यातून छत्रपतींचे जे रूप दिसते ते इतिहासापेक्षा जास्त विलोभनीय आहे!
 इतिहासाला अशी जिवंत कळा प्राप्त करून देणे हे ऐतिहासिक लघुकथेचे कार्य आहे. लघुकथा कल्पित असते. पण सर्व इतिहासाचे स्वच्छ प्रतिबिंब तिच्यात दिसत असल्यामुळे ते कल्पित जास्त सत्य असते. कल्पिताचा महिमा असा आहे.