पान:सौंदर्यरस.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
सौंदर्यरस
 

आणि तोफेच्या कान्यात तो हातोड्याने ठोकून तोफ निकामी करून टाकली. इकडे सर्जाने दवणागडाच्या तोफेचे हेच केले आणि इशारा दिला. खेळ पाहायला आलेले हजारो घोंगडे हे महाराजांचे शिपाई होते. तोफा निकामी झालेल्या पाहताच त्यांनी गडावर चढाई केली. दरवाजे फोडून ते आत घुसले आणि भयंकर मारगिरी करून एका प्रहाराच्या आत त्यांनी दोन्ही किल्ल्यांवर भगवा झेंडा चढविला.
 'ए टेल ऑल टू सिटीज्' या डिकन्सच्या कादंबरीचे विवेचन करताना, ई. एम्. फॉर्स्टर या प्रख्यात लेखकाने म्हटले आहे की 'फ्रेंच राज्यक्रांतीसारख्या सार्वजनिक घटनेशी सामान्य खाजगी व्यक्तींच्या जीवनाची इतकी एकजीव केलेली गुंफण मी दुसऱ्या कोणत्याही कथेत पाहिलेली नाही.'
 या गुंफणीतूनच साहित्यात एक सुंदर लेणे तयार होते. पुरंदरे यांनी 'कस्तुरा' हे तसे लेणे घडविले आहे.
 ही कथा आहे कस्तुराची आणि सर्जाची. त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त होण्याची वेळ आली ती मोगली अमल या ऐतिहासिक घटनेमुळे. सिद्दीच्या अमलामुळे घोसाळगडच्या यशोदेवर जसा प्रसंग आला होता तसाच हा प्रसंग! आग्ऱ्याहून निसटून आल्यावर महाराजांनी किल्ले परत घेण्याचा उद्योग आरंभिला ही सार्वजनिक घटना कस्तुराला डोळयापुढे ठेवून दुर्जयसालाने बक्षिस जाहीर केले ही वैयक्तिक वासनांमुळे झालेली घटना. कस्तुरेच्या साहसामुळे तिच्यावरचे संकट टळले. आणि दवणा-चाफेगडावर भगवे झेंडे चढले.
 बाबासाहेब पुरंदरे हे शिवशाहीर आहेत. ते अहोरात्र शिवकाळांतच रहातात. सध्याच्या काळात त्यांचे वास्तव्य फार थोडे असते. म्हणजे शिवकालाचे वातावरण त्यांनी प्रत्यक्ष जणू पाहिलेलेच आहे. तेव्हा ते त्यांनी किती सहजतेने निर्माण केले असेल ते सांगायला नको. मोहोरी, नांदिवली या खेड्यांची वर्णने, दवणा-चाफेगड किल्ल्यांची, मधल्या खिंडीची वर्णने. शिवगंगेच्या काठापासून चाललेली महाराजांची स्वारी, रायगडचे वर्णन, त्याचा उभा कडा सर्जा चढून गेला त्या वेळचे वर्णन- ही वर्णने वाचताना आपणही