पान:सौंदर्यरस.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कल्पिताचा महिमा
११९
 

किल्ल्यांवर मोगलांनी बारागंजी तोफा आणून बसवल्या होत्या. त्यामुळे ते अगदी दुर्भेद्य होऊन बसले होते. पण चाफेगडचा किल्लेदार दुर्जयसाल याच्या पापबुद्धीमुळे ते घेण्याची उत्तम संधी महाराजांना मिळाली.
 सर्जा आणि कस्तुरा यांचे डोंबाऱ्याचे खेळ गावोगाव चालत असत. रुस्तुमराव आणि दुर्जयसाल यांच्या ते वारंवार नजरेस पडत. आता कस्तुरा तारुण्यामुळे फारच लोभस दिसू लागली होती. त्यामुळे ते दोघे फार अस्वस्थ होऊन गेले होते. त्यातूनच रुस्तुमरावाला एक युक्ती सुचली. चाफेगड आणि दवणागड यांच्या मधे एक खिंड होती. या दोन्ही गडांवर दोन तोफा बसवल्या होत्या. खिंडीवरून त्या तोफांना त्यांनी एक मोठा दोर बांधला आणि जाहीर केले की, या दोरावरून जो चालत येईल त्याला पन्नास पुतळयांची माळ अन् एका गावची पाटीलकी असे बक्षिस मिळेल. कस्तुरा डोंबारी आहे आणि अतिसाहसी आहे, हे ध्यानात घेऊनच त्यांनी हे बक्षिस जाहीर केले होते. आणि तशी ती दोरावरनं किल्ल्यात आली की मग ती किल्लेदाराचीच होणारे, तिला तिथून कोणी सोडवू शकणार नाही हा त्यांचा डाव.
 गावोगाव दवंडी पिटलेली सर्जा- कस्तुरांनी ऐकली आणि कस्तुराने ते साहस करायचे ठरवले. सर्जाने तिला साथ दिली आणि महाराजांचा हेर बहिरजी नाईक याने पण त्यांना साथ दिली. गेलेले किल्ले परत घ्यायचे महाराजांचे ठरलेच होते.
 एका पुनवेच्या रात्री दवणागडाच्या बाजूने कस्तुरा हातात भाला घेऊन दोराजवळ निघाली. तेथल्या तोफेजवळ सर्जा ढोलगं वाजवीत उभा होता. त्या दोघांनी अट घातली होती की, या वेळी तोफेपाशी कोणीही उभे राहता कामा नये. कारण गलगा होईल आणि कस्तुरा बिचकेल. किल्लेदारांनी अट मान्य केली. फक्त एकेक शिपाई तोफेजवळ रहाणार होता.
 कस्तुरा निघाली. भाला आडवा धरून ती तोल सावरीत होती. तोफेजवळ पुतळयांची माळ लटकत होती. हजारो लोक घोंगड्या पांघरून तो चमत्कार पाहायला खाली जमले होते. कस्तुरा चाफेगडाच्या तोफेपाशी पोचली आणि क्षणार्धात झेप घेऊन तिने तेथल्या पहारेकऱ्याच्या छातीत भाला खुपसला. तो आडवा होताच तिने चपळाईने मोठा खिळा काढला