पान:सौंदर्यरस.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
सौंदर्यरस
 

रघुनाथाशी, प्रपंच करणेस फुरसद फावत नाही, मज रघुनाथजीवेगळे कोणी जिवलग नाही !'
 ही लघुकथा म्हणजे मराठीचे एक लेणे आहे!
 आणि तसेच दुसरे लेणे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली 'कस्तुरा' शिवछत्रपतींनी जयसिंगापुढे शरणागती पत्करली. कराराप्रमाणे तेवीस किल्ले- त्यातच मावळातले किल्ले- त्याच्या स्वाधीन केले, आग्ऱ्याला ते औरंगजेबाच्या भेटीस गेले, तेथून निसटून परत आले आणि गेलेले किल्ले परत घेण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला- या काळातली ही कथा आहे.
 किल्ले ताब्यात मिळाल्यावर भोवतालच्या प्रदेशात मोगलांची सत्ता सुरू झाली आणि त्याबरोबरच त्यांचे अत्याचारही सुरू झाले. धनधान्य लुटणे आणि स्त्रियांची विटंबना करणे हा त्यांचा नित्यक्रम असे. मावळातले चाफेगड आणि दवणागड या किल्ल्यांचा परिसर याला अपवाद नव्हता. या किल्ल्यामधल्या खिंडींच्या कुशीत मोहोरी हे लहानसे पाचपंचवीस उंबऱ्यांचे खेडे होते. तेथे गौरा आणि तिची मुलगी कस्तुरा या दोघी रहात असत. त्या डोंबारी जातीच्या होत्या. पलीकडल्या मुळशी परगण्याला डोंबारी लखा याचा मुलगा सर्जा, याची कस्तुरा ही बायको. मोगली अमल सुरू झाला तेव्हा कस्तुरा तेरा-चौदा वर्षांची होती. रूपान ती उजवी असल्यामुळे मोगली सरदारांचा तिच्यावर डोळा होता. प्रथम त्यांनी गौराक्काजवळ तिला विकत मागितले. पण तिने संतापून नकार दिला तेव्हा तिला पळवून नेण्याचाही एक-दोनदा प्रयत्न केला. पण त्या दोघी शिताफीने निसटल्या. पण काही करून कस्तुराला पळवायचीच, असे चाफेगडचा किल्लेदार बक्षी चंद्रभान दुर्जयसाल याचे ठरले होते. त्याचा कारभारी रुस्तुमराव नाइकवडी याची त्याला साथ होती.
 मावळात मोगलांचा बदअंमल चालू होता. लोक सर्व धास्तावून गेले होते. पण महाराज एक दिवस परत येतील आणि आपल्याला या नरकातून सोडवतील, अशी सर्वांना आशा होती. त्याप्रमाणे महाराज परत आले. आणि गेलेले किल्ले परत घेण्याचा विचार सुरू झाला. प्रथम त्यांचे लक्ष चाफेगड आणि दवणागड हे कार्ल्याजवळचे किल्ले यांकडे गेले. या दोन्ही