पान:सौंदर्यरस.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कल्पिताचा महिमा
११७
 

दिली. शिवप्रभू पायाशी बसले. मातोश्री म्हणाल्या, 'काय कमी पडले आम्हांस? एक पुत्र उशाशी, एक पायथ्याशी! प्रसादही प्राप्त झाला आहे. जीवनाचे सार्थक झाले.'
 असे म्हणून मोठ्या प्रयासाने मातोश्री उठून बसल्या. त्यांनी पद्मासन घातले. हातात जपमाळ घेतली. क्षणातच त्यांच्या नेत्रांतून तेज निघून सीतेच्या नेत्री सामावले.
 शरीर मागे कलंडले. शिवप्रभूंनी त्या तपःसंपन्न देहावर स्वतः पांघरूण घातले.
 परित्यक्ता म्हणून जी अभागी, दुर्दैवी, मातीमोल जिणे जगत असेल, अशी कल्पना होती तिच्या ठायी, शिवप्रभूंनाही आशीर्वाद देणारी अशी एक अद्भुत स्त्री लेखिकेने निर्माण केली आहे.
 आणि तसे करताना त्या काळचे वातावरण निर्माण करण्याचीही तिने कसोशी केली आहे. या घटनेची, त्या वेळचे लोक सारखी चर्चा करीत. त्यांच्या बोलण्यातून त्या वेळच्या धर्मकल्पना, आचार-विचार, माणसांच्या श्रद्धा, मनोवृत्ती- सर्व सर्व समोर दिसू लागते. गोंदाकाका हा जरा ठस माणूस. तो म्हणे ताईचे लग्न झालेच नाही. कन्यादान नाही. लाजाहोम नाही. सप्तपदी नाही. मग लग्न कसले ? तेव्हा तिच्याबद्दल पुन्हा विचार करायला हरकत नाही. असे म्हणताच सर्वांनी त्याच्यावर गहजब केला. हा चार्वाक आहे! कलिपुरुष आहे!
 मुलगी देताना ते घराणे शैव आहे का वैष्णव हे पहावे लागत असे. एका घरी आडवे सारवण, आडवे पोतेरे, एका घरी उभे ! एका घरी आडवे कुंकू, एका घरी उभे ! यात चूक झाली की पोरीचा छळ.
 भाषा कटाक्षाने सतराव्या शतकातली ठेवल्याने मनाला मोठा आल्हाद होतो. 'अवघे शिकले पाहिजे बरे', 'वडिली सांगितले ते सत्य म्हणून मी वागले. तू तशीच वाग', 'त्यांचे काय झाले म्हणवे ? आकाशाने उचलिला किंवा भूमीने गिळिला', 'सकळ चिंतिले मनोदय पावलो.' 'मातुश्रींची सेवा घडावी हा निश्चय जाहला', 'देहास अतिक्षीणता प्राप्त झाली आहे.', 'देव राजियास उदंड आयुष्य देवो', 'आता नाते एकट्या