पान:सौंदर्यरस.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४
सौंदर्यरस
 

इतिहासच सांगावयाचा असतो, असेही काही टीकाकार म्हणतात. प्रापंचिक सुखदुःखे नसली तर ती रचना म्हणजे कथा होत नाही. तो इतिहास होतो. आणि इतिहासाचे धागेदोरे नसले तर ती कथा होते, पण ती ऐतिहासिक कथा होत नाही. या दोन्हींची गुंफण झाली की, ऐतिहासिक लघुकथा होते. वरील दोन्ही कथांत इतिहास शून्य असल्यामुळे त्या नुसत्या कथा झाल्या.
 आता शेवटी दोन लघुकथांचे समीक्षण करून ऐतिहासिक लघुकथांचे हे विवेचन संपवावयाचे आहे. 'विराणी' (सौ. स्नेहलता दसनूरकर, 'विवेक' दिवाळी १९७१) आणि 'कस्तुरा' (बाबासाहेब पुरंदरे, 'किर्लोस्कर' दिवाळी १९७३) या त्या दोन कथा होत. माझ्या दृष्टीने या दोन्ही आदर्श, उत्कृष्ट अशा ऐतिहासिक लघुकथा आहेत. 'विराणी' ही समर्थ रामदासस्वामी यांच्या नियोजित वधूची कथा आहे. नारायण लग्न-मंडपातून पळून गेला आणि त्याची ही वाग्दत्त वधू तशीच मागे राहिली. तिचे पुढचे आयुष्य कसे गेले, तिचे पुढे काय झाले, याविषयी इतिहास काही सांगत नाही. कोणाला तिच्याविषयी काहीच माहिती नाही. अशा या, लग्नाच्या वेळी सात-आठ वर्षांच्या असलेल्या मुलीचे चित्र कल्पनेने उभे करून, तिच्या पुढील आयुष्यातील सुखदुःखाचे वर्णन या कथेत लेखिकेने केले आहे. आणि तसे करताना त्या काळचे स्त्रीजीवन, धार्मिक कल्पना, रूढी, समर्थांचा लोकमतावर पडत चाललेला प्रभाव, शिवाजीमहाराजांची या स्त्रीविषयीची भावना, या सर्वांचे सम्यक् दर्शन घडविले आहे.
 सामान्यतः कल्पना अशी होते की, नारायण निघून गेल्यावर त्याची ही नियोजित वधू सर्व जन्मभर रडत, नशिबाला बोल लावीत माहेरी राहिली असेल. आणि माहेरीही तिचे जीवन पोतेऱ्यासारखेच असणार. जुन्या काळी विधवा, परित्यक्ता या फुकट मिळालेल्या मोलकरणी अशीच दृष्टीने त्यांचे नातेवाईक त्यांना वागवीत. या विराणीच्या नशिबी तसलेच जीवन आले असेल असे मनात येते. पण लेखिकेने फार उदात्त असे व्यक्तित्व तिच्याठायी अर्पून तिचे जीवन अतिशय उच्च पातळीवर नेऊन ठेविले आहे. आणि ते त्या काळच्या वातावरणात इतके व्यवस्थित बसविले आहे की, ही खरी नवनिर्मिती होय असा मनाला प्रत्यय येतो.