पान:सौंदर्यरस.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कल्पिताचा महिमा
११३
 

तिच्या अचल निष्ठेचे वर्णन आहे. पण या कथेत इतिहासाचे धागेदोरे मुळीच नाहीत. सिद्धराज हा फार पराक्रमी व थोर राजा होता, बर्बक म्लेंच्छांचा त्याने पराभव केला होता. सौराष्ट्राचा अहीर राजा, गिरनागरचा खिंगार राजा, माळव्याचा यशोवर्मा यांचा पराजय करून त्यांचा प्रदेश गुजराथला जोडला होता. या इतिहासाचे कोणतेही पडसाद या कथेत नाहीत. सिद्धराज हा येथे सिद्धराज म्हणून दिसतच नाही. ही कोणाही व्यक्तीची कथा होऊ शकेल. म्हणून ही ऐतिहासिक लघुकथा होत नाही. 'जंजिऱ्याच्या तटावरून' या कथेतील यशोदा आणि केरोबा यांची सुखदुःखे प्रापंचिक आहेत. पण मोठया ऐतिहासिक घटनांशी ती कार्यकारणाने निगडित बाहेत. त्यांच्या भावभावनांतून इतिहासाचे प्रवाह आपल्याला कळतात. म्हणून ती ऐतिहासिक लघुकथा होते. 'दिवा जळू दे सारी रात' या कथेत इतिहास असा काहीच दिसत नाही. त्यातील घटनांचे प्रतिबिंब या कथेत पडत नाही.
 'दानत' ही कथा अशीच आहे. राजस्थानातील धूमली नगरचा राजपुत्र मेह जेठवा हा वादळात सापडला असताना, अमरा या चारण जातीच्या एका शेतकऱ्याने त्याला आश्रय दिला. त्याची कन्या उजळी हिचे जेठवावर प्रेम जडले. तोही तिच्यावर आसक्त झाला. आणि मग धूमली नगरीहून वरचेवर येऊन जेठवा उजळीच्या संगतीत राहात असे. उजळीला वाटे हा केव्हा तरी लग्नाची भाषा काढील. पण तसे होईना. तिचे वडील तिला बजावीत होते की, तो राजा आहे. रजपूत आहे. आपण चारण म्हणजे त्याहून हलक्या जातीचे आहो. तो तुला स्वीकारणार नाही. पण उजळीचा त्याच्यावर विश्वास होता. म्हणून ती त्याच्या धूमली नगरीला गेली. पण त्याने तिच्या हलक्या जातीमुळे तिचा स्वीकार केला नाही. उजळीने त्याची निर्भर्त्सना केली व एका मंदिरात जाऊन ती संन्यासिनीसारखी राहू लागली, मेह जेठवा हाही अपराधाच्या जाणिवेनें खंगत चालला व शेवटी मृत्यू पावला.
 ही कथाही लघुकथा म्हणून चांगली आहे. पण तिच्यात इतिहास शून्य आहे. ऐतिहासिक लघुकथेत पार्श्वभूमी म्हणून इतिहास येणे अवश्य असते. किंबहुना व्यक्तीच्या प्रापंचिक सुखदुःखाच्या माध्यमातून अशा कथांत
 सौं. ८