पान:सौंदर्यरस.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२
सौंदर्यरस
 

दिली. प्रथम अकबर जोरातच होता. पण, आपण छत्रपतींचा अपमान केला असल्यामुळे, आपल्या तैनातीला दिलेला सरंजाम जप्त करण्यात आला आहे, असे कविकलश यांनी त्याला सांगितले, तेव्हा त्याची धुंदी उतरली. आणि छत्रपतींनी आपला हा कडेलोटच केला आहे, असे त्याला वाटले.
 यातील रामप्यारीवरचे अकबराचे प्रेम आणि त्याने तिला बाटविल्यामुळे व तिला कंठा दिल्यामुळे त्याच्यावर आलेला प्रसंग या घटना ऐतिहासिक नाहीत. पण एक तर यांतून वैयक्तिक जीवनाची कथा अशी निर्माणच होत नाही आणि दुसरे म्हणजे तिच्यातून तत्कालीन ऐतिहासिक जीवनाचे दर्शन मुळीच घडत नाही. 'जंजिऱ्याच्या तटावरून' या कथेत त्या काळच्या लोकजीवनाचे चित्र आपल्या डोळयांपुढे उभे रहाते तसे तर या कथेतून काहीच दिसत नाही. शहाजादा अकबर हा दक्षिणेत छत्रपती संभाजी यांच्याकडे आला. हा प्रसंग इतिहासात फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे निर्माण झालेले सर्व प्रक्षोभ हा ऐतिहासिक लघुकथेचा उत्तम विषय झाला असता, पण त्याची काही जाणही या कथेतून निर्माण होत नाही.
 ऐतिहासिक लघुकथांची लक्षणे पहाण्यासाठी येथे आणखी दोन कथांचा विचार करू. 'दिवा जळू दे सारी रात' ('वसंत', दिवाळी, १९७३) आणि 'दान' ('वसंत', दिवाळी १९७२) या दोन कथा श्रीमती सुलोचना लिमये यांच्या आहेत. या कथा इतिहासकाळच्या आहेत. लघुकथा या दृष्टीने त्या वाचनीय आहेत. पण त्यांना ऐतिहासिक लघुकथा म्हणता येत नाही. सिद्धराज जयसिंह हा सोळंकी वंशातला राजा अकराव्या शतकाच्या अखेर गुजराथच्या गादीवर आला. त्याला एक फार मोठा तलाव बांधायचा होता. म्हणून हजारो वडारी कुटुंबे त्याने कामाला लावली. त्या वडाऱ्यांत मिरगा आणि जसमल ही पतिपत्नी पण होती. जसमल अत्यंत सुरेख होती. जयसिंहाच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली. त्याने हर प्रयत्न केले, आमिषे दाखविली; पण जसमल बधली नाही. शेवटी राजाने जबरीने तिला ओढून न्यायचे ठरविले. तेव्हा राजा परत येण्याच्या आधीच मिरगा व जसमल यांनी चिता पेटवून तीत उडघा घेतल्या.
 वर म्हटल्याप्रमाणे ही चांगली लघुकथा आहे. तिच्यात समरप्रसंग आहे. वैयक्तिक भावनाविकार यांचा खेळ आहे. जसमलची व्यक्तिरेखा आहे.