पान:सौंदर्यरस.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०
सौंदर्यरस
 

त्यासाठी औरंजेबाने तापलेल्या सांडसाने त्यांचे डोळे काढले, जबान छाटली, पण राजे रेसभरही हालले नाहीत की त्यांनी सुस्कारा टाकला नाही. (हा प्रसंग आग्ऱ्याला यमुनातीरी दिवाण-ए-आममध्ये घडला असा लेखिकेचा चुकीचा समज झालेला दिसतो.) या भीषण, उग्र पौरुषामुळे शहाजादी क्षणभर स्वतःचे भानच विसरली. रात्री बादशहाने तिला आपल्या महालात बोलाविले. त्याला तिच्या अंतरीच्या भावनांची कल्पनाच नव्हती. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. त्याला वाटले, संभाजीने अपमान केल्यामुळे ती संतापली आहे. आणि तिचे अश्रू हे क्रोधाचे अश्रू आहेत!
 या ठिकाणी लेखिकेने मोगल राजकन्यांच्या अंतरीच्या वेदनांचे उत्कृष्ट वर्णन केले आहे. मोगल घराणे सर्वात श्रेष्ठ, त्यामुळे त्यांच्या कन्यांना त्याहून श्रेष्ठ घराणे मिळणे अशक्य; तेव्हा त्यांनी जन्मभर अविवाहितच राहायचे ! रोशन आराच्या मनात आले, हे अब्बाजान, ते बड़े वालीद (शहाजहान) यांना आमच्या भावनांची काहीच कशी कल्पना येत नाही ? शहाजादी म्हणजे काय पांढरीशुभ्र गारगोटी आहे ? तिला यौवनाचा स्पर्शच होत नाही ? काळदेखील तिच्या डोळ्याला डोळा न देता जातो ? काय, आहे तरी काय ?
 रोशन आराच्या डोळ्यांना ते दोन डोळे (संभाजीचे) भेटले. पण त्याच क्षणी अब्बाजाननी ते फोडून टाकले !
 अब्बाजाननी जवळ बोलावल्यावर तिने धीर करून संभाजी महाराजांच्या हातात ज्या हातकड्या घातल्या होत्या त्या त्यांच्याजवळ मागितल्या. 'जरूर जरूर बेटी !' अब्बाजान म्हणाले. 'त्या मगरूराला कुत्र्याच्या मौतीने मारले त्याची निशाणी असू दे तुझ्याजवळ !' शहाजादी हातकड्या घेऊन महालात गेली आणि त्यांच्यावर ओठ टेकून तिने मनातल्या कल्पान्तीच्या दुःखाला वाट करून दिली.
 याही कथेत शहाजादीच्या महालाचे वर्णन, औरंजेबाच्या दरबाराचे वर्णन, संभाजीच्या उग्र सौंदर्याचे चित्रण आणि नामुमकिन, दास्तान, खुशबू बेरहम, मासूम बच्ची है, दक्खनचा राजा, कमबख्त, जल्लाद लोकिन, ही भाषा यांनी आपण सतराव्या शतकातील मुस्लिम आणि मराठे यांच्या सहवासाचा लाभ घेऊ शकतो.