पान:सौंदर्यरस.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
सौंदर्यरस
 

प्रसिद्ध घटना आहे पण त्याची कन्या जेठाई ही तशी प्रसिद्ध नाही. इतिहासकार तिचा फारसा निर्देशही करीत नाहीत. 'समर्पण' या कथेची ती नायिका आहे. रामदेवराव नृत्यगायनाच्या मैफलीत नेहमी दंग असे. अशाच एका बैठकीत वार्ता आली की, दिल्लीच्या सुलतानाची स्वारी देवगिरीवर आली आहे. पण रामदेवराव तिकडे लक्षही देईना. अशा वेळी जेठाईने पुढाकार घेऊन राज्यरक्षणाची फार जोराची धडपड केली. घोड्यावर बसून हाती तलवार घेऊन ती सर्व किल्ल्यावर दौडत होती. सेनेला उत्तेजन देत होती. पण तिचे काही चालले नाही. रामदेवरावला, गनिमावर चालून जा, म्हणून तिने विनविले. पण तो अगदीच बुळा झाला होता त्याने हाय खाऊन शरणागती पतकरली. मध्यंतरी राजपुत्र शंकरदेव याने मोठ्या त्वेषाने अल्लाउद्दिनावर हल्ला चढविला होता. त्याच्या मदतीस जावे म्हणून जेठाईने पुन्हा पित्याला विनविले. पण त्याने बळ धरलेच नाही. आणि शेवटी अल्लाउद्दिनापुढे लोटांगण घालून त्याने त्याला राजकन्या देण्याचे मान्य केले. सुलतानाने तशी अटच घातली होती.
 लेखिकेने जेठाईच्या भावनांचे, तिच्या विकारविचारांचे उत्तम वर्णन केले आहे. पित्याबद्दल तिला भक्ती आहे, पण त्याच्या नादानीची चीड आहे. जातीने रणात उतरावे हे धैर्य तिला आहे. आपल्या राजपूतपरंपरेचा तिला अभिमान आहे. पण हे सर्व व्यर्थ आहे हे पाहून तिला पराकाष्ठेचे दुःख झाले. आणि, अल्लाउद्दिनाला मी कन्या देण्याचे वचन दिले आहे, हे पित्याचे शब्द ऐकले तेव्हा तर तिला कल्पान्त आठवला. मग तिने ते का मान्य केले ? ते केले नसते तर किल्ल्यात शिरून मुस्लिमांनी हजारो स्त्रियांची विटंबना केली असती. 'माझ्या माय-बहिणींच्या इज्जतीच्या रक्षणासाठी मी आत्मसमर्पण करायला तयार आहे' असे म्हणून ती त्या नरकयातना भोगण्यास सिद्ध झाली.
 या भाववर्णनाबरोबरच सौ. देसाई यांनी वातावरणनिर्मितीही उत्तम केली आहे. जेठाई, हुस्नबानू गायिका यांचे रूप व वस्त्रालंकार यांचे रेखीव वर्णन या कथेत आहे. एकीची पैठणी, दुसरीचा कमीजा यांचा उल्लेख आपल्याला भूतकाळात नेतो. घृष्णेश्वराचे मंदिर, संगीत मैफलीसाठी उभारलेला शामियाना, अल्लाउद्दिनाची छावणी यांची वर्णनेही गतकालाचा