पान:सौंदर्यरस.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कल्पिताचा महिमा
१०७
 

 'आम्ही एकमताने निर्णय घेतला', 'आमचे सहकार्य राहील' 'महंमद घोरीचे नेतृत्व', 'केळवाडचा प्रशासक' प्रश्न गंभीर होता, पाशवी आक्रमण, तरुण सैनिक, युवाशक्ती, खिंड पास करणे कठीण आहे, 'मी त्यांच्याबरोबर सानंद परतेन' ही भाषा अर्वाचीन आहे. ती मागील काळच्या वर्णनात येऊ नये. त्या वेळच्या संभाषणात तर ती अगदी वर्ज्य मानली पाहिजे. कारण या भाषेने स्वतःच्या काळाची जाणीव कायम राहते. इतिहासकाळाच्या वातावरणाचा तिच्यामुळे भंग होतो.
 ऐतिहासिक लघुकथेत इतिहासप्रसिद्ध व्यक्ती, ऐतिहासिक व्यक्ती या प्रधान असू नयेत, कथा त्यांच्या जीवनाभोवती गुंफू नये; तर ती त्या काळच्या सामान्य व्यक्तीच्या जीवनाभोवती गुंफावी, तिला प्राधान्य द्यावे आणि तिच्या प्रापंचिक सुखदुःखांतून इतिहासाचे प्रवाह दाखवावे हे ऐतिहासिक लघुकथेचे मुख्य तत्त्व, पण इतिहासातल्या गौण व्यक्ती कथेसाठी निवडल्या, ज्यांचा इतिहासात केवळ निर्देश आहे, पण ज्यांच्या कार्याचे वर्णन इतिहास करीत नाही, कारण इतिहासाच्या दृष्टीने त्याचे काही महत्त्व नसते, अशा व्यक्तींच्या जीवनाच्या कथा रचल्या, आणि त्यांच्या जीवनातून इतिहासाचे धागेदोरे दाखविले, तर अशा कथाही ऐतिहासिक लघुकथा म्हणून यशस्वी होतात. कारण त्यात कल्पिताला पुष्कळच अवसर असतो. मुख्य कटाक्ष यावर आहे. माधवराव- रमाबाई, बाजीराव- मस्तानी यांना प्राधान्य असले की, तेथे कल्पिताला फारसा वाव राहात नाही. इतिहासाने त्यांची चरित्रे वर्णिलेली असतात. गौण व्यक्तींच्या बाबतीत तसे नसते. म्हणून त्यांच्या कथा या नवनिर्मिती होऊ शकतात.
 या दृष्टीने 'समर्पण' (सो. नयनतारा देसाई, सहयाद्री, दिवाळी १९७२) आणि 'प्रीतीची रीत अशी' (सौ. मृणालिनी देसाई, 'लोकसत्ता', दिवाळी १९७५) या दोन कथांचा विचार करू. रामदेवराव यादव देवगिरीवर राज्य करीत असताना अल्लाउद्दिनाने देवगिरीवर स्वारी केली. रामदेवराव अत्यंत नादान राजा होता. त्याची कसलीही तयारी नव्हती. त्यामुळे त्याचा पूर्ण पराभव झाला त्याला शरणागती पतकरावी लागली आणि सोनेमोती, जडजवाहीर या खंडणीबरोबरच आपली कन्या जेठाई हीही अल्लाउद्दिनला द्यावी लागली. रामदेवाचा पराभव ही इतिहासातील