पान:सौंदर्यरस.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
सौंदर्यरस
 

यांना घेऊन ती आधीच घाटात आली व एका उंच जागी झाडाआड बसून अकबराचे सैन्य खिंडीत येताच, त्या तिघींनी त्याच्यावर गोळीबार सुरू केला अकबर चकित झाला, अवाक झाला. 'बाप रे! फक्त तीन स्त्रिया !'
 एवढ्यात समोरच्या सैन्याचा पराभव करून या पहाडाकडून खिंडीतून येणाऱ्या तुकडीशी मुकाबला करण्यासाठी पुत्त सेना घेऊन आला. दरम्यान गोळ्या लागून त्या तीनही स्त्रिया पडल्या होत्या. त्यांना पाहून पुत्त शोक करू लागला. राणी कर्मवती थोडी जीव धरून होती. 'तू येथे शोक करीस बसू नको' असा पुत्ताला आदेश देऊन तिने प्राण सोडले.
 या कथा म्हणजे इतिहासच आहे. लेखकाने स्वतःच्या कल्पनेने निर्माण केलेले जीवन त्यात नाही. महंमद घोरी किंवा अकबर यांच्या स्वाऱ्यांमुळे एकंदर लोकजीवनावर काय परिणाम झाला, जनतेच्या प्रपंचात त्यामुळे कोणत्या आपत्ती आल्या, त्यांच्या मनात कोणते प्रक्षोभ माजले याचा मागमूसही यात नाही. इतिहासात येऊन गेलेले राष्ट्रीय व्यक्तींचे सार्वजनिक जीवन हाच त्यांचा विषय आहे. कथासूत्र तेच आहे. थोडी संभाषणे, थोडे भाववर्णन एवढेच कल्पित त्यात आहे. लेखकाचे नवे असे एवढेच. आणि तेही प्रापंचिक जीवनातले नव्हे. यामुळे या हकीकती म्हणजे ललितकथा होत नाहीत.
 वैयक्तिक जीवनातील सुखदुःखाइतकेच ऐतिहासिक लघुकथेत तत्कालीन वातावरण निर्माण करण्याला महत्त्व असते. आपला सध्याचा काळ सोडून आपल्याला गत काळात, इतिहासकाळात शिरावयाचे असते. वातावरणनिर्मितीवाचून तसा आभास निर्माण होत नाही. त्या काळच्या लोकांचे आचारविचार, रूढी, भाषा, तत्कालीन सामाजिक परिस्थिती, जड परिस्थिती म्हणजे घरे, अंगणे, रस्ते, वाहतूक, वाहने या सर्वांच्या वर्णनाने ऐतिहासिक वातावरण निर्माण होते. पण कित्येक कथांत तसा प्रयत्नही केला जात नाही. नुसत्या भाषेच्या बाबतीत दक्षता घेतली, तत्कालीन शब्द, वाक्यरचना यांची मधूनमधून पेरणी केली आणि चालू काळातच रूढ झालेले शब्द व वाक्यरचना कटाक्षाने टाळल्या तर आपण इतिहासकाळात गेल्याचा भास निर्मिता येतो. पण अशी दक्षता फारशी कोणी घेत नाही.