पान:सौंदर्यरस.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
सौंदर्यरस
 

त्याला विनवले होते. त्यामुळे हुरळून जाऊन सिद्दी फत्तेखान याने तिला तटावर नेले होते. तेथे त्याने तिच्या कमरेला विळखा घालताच सर्व बळ एकवटून त्याला तिने दूर लोटले व आपण जंजिऱ्याच्या तटावरून समुद्रात उडी घेतली. एरवी ती बुडून मेलीच असती. पण त्याच वेळी किल्ल्याची पहाणी करायला महाराजांच्या दर्यासारंगाचा एक तांडेल होडी घेऊन जंजिऱ्याच्या पायथ्याशी आला होता. खलाशांच्या मदतीने त्याने यशोदेला उचलून होडीत घेतले. यशोदा जास्तच घाबरली. 'अरे तू कोण माझ्या मार्गात आलास ? मी एका आगीतून बचावले. आता कुठल्या फोपाट्यात नेऊन घालतोस मला ?' असे ती आक्रंदू लागली. पण तो तांडेल म्हणाला, माझ्या धर्माच्या भैणी, काळजी करू नको. शिवाजीमहाराजांचा तांडेल हाय मी तुला सुखरूप नेऊन पोचवितो बघ !'
 ही खरी ऐतिहासिक लघुकथा आहे. हा काळ शिवाजीमहाराजांचा आहे. पण महाराज स्वतः प्रत्यक्ष येतच नाहीत. ते पार्श्वभूमीत आहेत. कथा आहे ती यशोदा आणि केरोबा यांची, आणि प्राधान्याने यशोदेची. तिच्या मनातले पतिवियोगाचे दु:ख, त्याच्याविषयी अहोरात्र लागलेली चिंता, तो परागंदा असताना तिला दिवस गेले यामुळे लोकांत झालेली बदमामी आणि त्यामुळेच तिच्यावर कोसळलेले सुलतानी संकट. हे सर्व प्रापंचिक सुखदुःख आहे.
 पण हे सर्व त्या काळच्या ऐतिहासिक घडामोडींमुळे निर्माण झालेले सुखदु:ख आहे. सिद्दीचे व शिवाजी महाराजांचे वैर. त्यामुळे केरोबाला परागंदा व्हावे लागले. घरी यायचे ते लपूनछपून यावे लागले. त्या भेटीतूनच यशोदेला पुत्रलाभ झाला. एरवी हा मोठा आनंद, पण त्या परिस्थितीत त्यातूनच अनर्थ उद्भवला, सिद्दीची पापवासना ही नित्याचीच गोष्ट होती. तीमुळेच यशोदेवर तो भीषण प्रसंग आला. आणि जंजिऱ्यावर स्वारीची पूर्वतयारी चालू होती, तो तांडेल त्यासाठी रात्रीच्या अंधारात किल्ल्याच्या पायथ्याशी आला होता, म्हणूनच त्या प्रसंगातून यशोदेची सुटका झाली. यशोदेची सुखदुःखे सर्व प्रापंचिक आहेत, वैयक्तिक आहेत. पण ती त्या काळच्या इतिहासातून उद्भवलेली आहेत. म्हणून ही ऐतिहासिक ललितकथा आहे.