पान:सौंदर्यरस.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कल्पिताचा महिमा
१०३
 

येऊन राहिली, आणि पती सुखरूप असोत, त्यांची लवकरच भेट होवो, असा देवाचा धावा करीत ती भयग्रस्त मनाने काळ कंठू लागली.
 केरोबा परागंदा झाल्याला सहा महिने झाले. गणेश चतुर्थी आली. दर वर्षीचे गणेशपूजेचे व्रत चुकू नये म्हणून आदल्या दिवशी रात्री लपत- छपत केरोबा घरी आला. तो आल्यामुळे यशोदेला मनातून हर्ष झाला, पण तितकीच भीतीही वाटली. कारण सिद्दीला सुगावा लागता तर त्याने त्याचा कडेलोटच केला असता. पण तसे झाले नाही. पूजा करून केरोबा रात्री निघून गेला. पण या दोन दिवसांच्या भेटीत यशोदेला दिवस गेले. तिला फार आनंद झाला, पण त्यामुळेच तिच्यावर भयानक आपत्ती ओढवली.
 तीन-चार महिने झाल्यावर तिची अवस्था लपून रहाणे शक्य नव्हते. केरोबासाठी सिद्दीने तिच्या घरावर पाळत ठेवलीच होती. ती गरोदर आहे हे समजताच त्याने तिला पकडून नेले आणि जाब विचारला. तो म्हणाला, 'एक तर केरोबा कोठे आहे ते सांग, नाही तर, तू व्यभिचार केला आहेस, हे कबूल कर.' यातले काहीच करणे यशोदेला शक्य नव्हते त्यामुळे तिच्यापुढे कल्पान्त उभा राहिला.
 केरोबा परागंदा झाल्यावर खरोखरच रायगडला जाऊन त्याने शिवाजीमहाराजांची भेट घेतली होती आणि लवकरच जंजिऱ्यावर स्वारी करावी असा महाराजांचा विचार ठरला होता. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या भेटीत, 'तीन-चार महिन्यांत महाराज जंजिरा घेतील, आणि मग मी पुन्हा घोसाळगडाचा किल्लेदार होऊन येईन, तू धीर घर' असे आश्वासन त्याने यशोदेला दिले होते. त्या आश्वासनावर ती काळ कंठीत होती. पण आता सर्वच संपले होते.
 सिद्दीने तिला सांगितले की, पापाचा अंकुर स्त्रीच्या पोटात वाढतो आहे, असे दिसले तर तिचा आम्ही मुसलमानाशी निका लावून देतो. आणि तू अस्मानातील परीसारखी सुंदर असल्यामुळे मीच तुझ्याशी निका लावणार आहे. दुसऱ्या दिवशी त्याने तिला जंजिऱ्याच्या तटावर नेले आणि एका बुरुजाच्या कमानीत तिला नेऊन तो तिच्याशी लगट करू लागला.
 हा प्रसंग येणार हे यशोदा जाणूनच होती. तिचा निश्चय आधीच झाला होता 'अंधारकोठडीतून मला मोकळ्या हवेत न्या', म्हणून तिनेच