पान:सौंदर्यरस.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
सौंदर्यरस
 

भोवतालच्या परिसरावर सिद्दीचीच सत्ता होती. मोगल, विजापूर यांचा सिद्दी हा दोस्त असून तो स्वतः कडवा मुसलमान आणि अर्थातच कडवा हिंदुधर्मद्वेष्टा होता. भोवतालच्या परिसरात घुसून सर्वत्र लुटालूट, जाळपोळ विध्वंस करणे, हिंदू स्त्रियांवर बलात्कार करण, त्यांना पळवून नेणे, त्यांची विटंबना करणे, त्यांना मस्कत, बसरा यांसारख्या दूरदेशी नेऊन विकणे, हा त्याचा व त्याच्या शिपायांचा नित्याचा उद्योग. पुरुषांना पकडून त्यांना ते गुलाम म्हणून विकीत. त्यांना गोणत्यात घालून समुद्रात बुडवीत, त्यांच्या कत्तली करीत. याच वेळी शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापनेच्या उद्योगास प्रारंभ केला होता. कोकणात त्यांच्या स्वाऱ्या होत होत्या. जंजिरा घेऊन सिद्दीला उखडून लावणे हा त्यांच्या उद्देश होताच. जंजिऱ्याच्या हद्दीत जाऊन भेद करावा, तेथील माणसे वश करून घ्यावी आणि सिद्दीला शह द्यावा, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे त्या मुलखात एक नवी आशा निर्माण झाली होती. सिद्दीचे राज्य हे सैतानाचे राज्य होते. त्या नरकयातनांतून आपल्याला सोडविणारा एक महापुरुष अवतरला आहे, अशी लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण झाली होती आणि सिद्दीच्या व पोर्तुगीजांच्या अंमलाखालचे काही लोक महाराजांना वशही झाले होते. अनेकांनी तसे अनुसंधान बांधण्याचा प्रयत्न चालविला होता.
 अशा या काळातली व अशा या वातावरणातली 'जंजिऱ्याच्या तटावरून' ही कथा आहे, पण ती कोण्या इतिहासप्रसिद्ध व्यक्तीची कथा नाही. यशोदा नावाच्या एका सामान्य स्त्रीची ती कथा आहे.
 यशोदेचा पती केरोबा टिकले हा सिद्दीच्या राज्यातील घोसाळगड हा जो किल्ला तेथला किल्लेदार होता. यशोदेचे लग्न झाले तेव्हा या किल्ल्यावर दासदासी, नोकर, पालखी अशा मोठ्या वैभवात ती होती. पण ते सिद्दीचे राज्य होते. आज शिखरावर तर उद्या धुळीत. केरोबा शिवाजीला फितूर आहे, अशी सिद्दी फत्तेखान याच्याकडे कोणी चुगली केली. त्याचे कान भरले. लगेच त्याने त्याला पकडण्यासाठी शिपाई पाठविले. पण केरोबाला आधीच बातमी लागून तो एकदम परागंदा झाला. मग यशोदेला गडावर रहाणे शक्य नव्हते. घोसाळगड सोडून ती राजपुरीला आपल्या घरी