पान:सौंदर्यरस.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कल्पिताचा महिमा
१०१
 

जीवनाचे चित्रण ललित साहित्याला वर्ज्य आहे, असा याचा अर्थ नाही. पण सार्वजनिक जीवनाचे दर्शन व्यक्तिजीवनाच्या माध्यमातून घडविले तर त्या लेखनाला लालित्य येते. आणि व्यक्तीच्या माध्यमातून याचा अर्थ, व्यक्तीच्या विचारातून असा नव्हे, तर व्यक्तीचे रागद्वेष, असूया, मत्सर, प्रेम, माया, वात्सल्य, संताप, स्नेह, लोभ, त्याग, भक्ती, चीड या विकारांच्या माध्यमातून.
 हे जे एकंदर ललित किंवा कल्पित साहित्याविषयी म्हटले तेच ऐतिहासिक साहित्याविषयी म्हणजे कादंबरी व लघुकथा यांविषयी खरे आहे, ऐतिहासिक लघुकथा ही इतिहासकाळातल्या कोठल्या तरी व्यक्तीच्या खाजगी, वैयक्तिक जीवनातील सुखदुःखाची कथा असावी. शिवछत्रपती, श्रीमंत थोरले बाजीराव, माधवराव यांच्या काळची कथा असली तर तीत हे थोर पुरुष कथानायक म्हणून येऊ नयेत. त्यांचे जीवन हा इतिहास आहे. ते सार्वजनिक जीवन आहे. ते लघुकथेत यावे, पण ते पार्श्वभूमी म्हणून यावे. आणि कथा असावी ती त्यांच्या काळच्या कोणा तरी सामान्य व्यक्तीच्या प्रापंचिक सुखदुःखाची असावी. भोवताली घडणाऱ्या ऐतिहासिक घडामोडींचे पडसाद त्या कथेत अवश्य यावे. इतकेच नव्हे तर त्या घडामोडी त्या व्यक्तीच्या सुखदुःखाला कारणीभूत झालेल्या असाव्या. पण त्या घडामोडींचे किंवा त्या घडविणाऱ्या थोर पुरुषांचे वर्णन हा कथेचा मूळ उद्देश नसावा. ते कथासूत्र नसावें, त्या घडामोडींचे, त्या घटनांचे पडसाद आले की, कथा ऐतिहासिक होते आणि प्रापंचिक सुखदुःखे हा वर्ण्यविषय झाला की ती ललितकथा- लघुकथा होते. थोर ऐतिहासिक पुरुषांना कथेत प्राधान्य आले की, कथा चरित्र किंवा इतिहास हे रूप घेऊ लागते. तो विषय सार्वजनिक होतो आणि त्यामुळे लालित्य कमी होऊ लागते. हे थोर पुरुष म्हणजे ऐतिहासिक घटना आहेत, कल्पित घटना नव्हेत. आणि ललित वाङ्मय ही नवनिर्मिती आहे. ती कल्पित असण्यातच तिच्या सौंदर्याचे रहस्य आहे.
 एका चांगल्या लघुकथेचे उदाहरण घेऊन हे स्पष्ट करतो. 'जंजिऱ्याच्या तटावरून' ही महादेवशास्त्री जोशी यांची ऐतिहासिक लघुकथा पाहा. कोकणातील राजापूरजवळचा जंजिरा हा किल्ला म्हणजे सिद्दीचे मुख्य ठाणे. शिवाजीमहाराजांच्या कारकीर्दीच्या प्रारंभकाळी जंजिऱ्याच्या