पान:सौंदर्यरस.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






कल्पिताचा महिमा



 मराठी ऐतिहासिक लघुकथांचे दालन फारसे समृद्ध नाही. तुलनेने पहाता, अलीकडे ऐतिहासिक कादंबरीला पुष्कळच बहर आलेला दिसतो. ऐतिहासिक कादंबरीची निर्मितीही मध्यंतरी वीस-पंचवीस वर्षे खंडित झाली होती, पण अलीकडे पंधरा-वीस वर्षे, मराठी लेखकांचा ओढा या कादंबरीकडे बराच आहे, असे दिसते. पण ऐतिहासिक लघुकथालेखनाकडे मात्र तसा ओढा दिसत नाही. तरी, कादंबरीकडे लेखक पुन्हा वळले तसे कथेकडे वळण्याचा संभव आहे. म्हणून गेल्या आठ-दहा वर्षांत लिहिल्या गेलेल्या ऐतिहासिक लघुकथांचा थोडा परामर्श घ्यावा असा विचार केला आहे.
 ऐतिहासिक कादंबरी आणि ऐतिहासिक लघुकथा यांच्या सौंदर्याच्या घटकांत तसा फारसा फरक नाही. विस्ताराच्या फरकामुळे रचनातंत्रात, आणि त्यामुळे सौंदर्यघटकांत फरक पडेल हे खरे. पण तो मूलगामी फरक नव्हे. तेव्हा सौंदर्याचे निकष दोन्हीकडे जवळजवळ तेच असणार हे उघड आहे.
 साहित्यकलेच्या सौंदर्याचे पहिले तत्त्व हे आहे की, तिच्यात माणसांच्या खाजगी, वैयक्तिक जीवनाचे चित्रण असले पाहिजे, सार्वजनिक जीवनाचे नव्हे. कादंबरी, नाटक, लघुकथा व काव्य हे कल्पित साहित्याचे मुख्य प्रकार होत. व्यक्तीच्या खाजगी संसारातील सुखदुःखाच्या कथा सांगणे, हेच यांचे उद्दिष्ट असले पाहिजे. कारण वाचकांना खरा रस यातच असतो. सार्वजनिक