पान:सौंदर्यरस.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जीवनाचे भाष्यकार तात्यासाहेब केळकर
९९
 

गाईली आहे. विद्या, तत्त्वज्ञान हे त्याचे धन आहे व साहित्य हे त्याचे शस्त्र आहे. यांनी सन्नद्ध असल्यामुळे नवी सृष्टी, नवी दृष्टी व नवी तुष्टी समाजात निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी निश्चित आहे. आज अनेक कारणांमुळे या आत्मज्ञानाचा त्याच्या ठायी लोप झालेला आढळतो. साहित्याने जे समाजाचे प्रबोधन करायचे, ते त्याच्या हातून होत नाही असे दिसून येत आहे. अशा वेळी साहित्यातील क्रांती, साहित्याचे कार्य, साहित्यापासून होणारा आनंद व साहित्य आणि जीवन यांचा घनिष्ठ संबंध, यांविषयी तात्यासाहेबांनी केलेले भाष्य त्याने अभ्यासले, तर सध्याच्या विपत्तीतून त्याला मार्ग सापडेल असा विश्वास वाटतो.