पान:सौंदर्यरस.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जीवनाचे भाष्यकार तात्यासाहेब केळकर
९७
 

असे नाही. पण एक-दोन गट महाराष्ट्रात तसे निश्चित आहेत. त्यांना ओंगळ अश्लील व दुर्बोध साहित्य प्रसविण्यात व प्रकाशिण्यात भूषणच वाटते. आणि साधारणपणे प्रतिष्ठित समजले जाणारे सर्व टीकाकार त्याचाच उदोउदो करताना दिसतात.
 तात्यासाहेबांचा जीवनविषयक दृष्टिकोण काय होता याची सम्यक् कल्पना वरील विवेचनावरून येईल असे वाटते. साहित्यात मोठे परिवर्तन किंवा क्रांती कशामुळे घडते, साहित्यापासून आनंद होण्याचे खरे कारण काय, विज्ञानाची प्रगती व प्रतिभा यांचे संबंध कसे असतात, विनोदाला समाजात केव्हा प्रतिष्ठा लाभते इत्यादी प्रश्नांची त्यांनी जी मीमांसा केली आहे, तीवरून- म्हणजे त्यांच्या बहुविध साहित्यसमीक्षाविषयक लेखांच्या आधारे- त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान समजून घेण्याचा हा प्रयत्न केला आहे. तात्यासाहेबांच्या साहित्याच्या अभ्यासकांना तो यथार्थ वाटेल अशी आशा वाटते.

*

 आता साहित्याचा शिल्पकार कोणत्याही समाजात मध्यम, बुद्धिजीवी वर्ग हाच असतो, या तात्यासाहेबांच्या सिद्धान्ताचा परामर्ष घेऊन हे विवेचन पुरे करू.
 'साहित्य आणि जीवन' या आपल्या लेखात ('सह्याद्रि खंड' : पृ. २७०) तात्यासाहेबांनी वरील सिद्धान्त मांडला आहे. प्रथम त्यांनी साहित्य व इतर कला यांची तुलना करून 'साहित्यकला ही श्रेष्ठ होय.' असा अभिप्राय दिला आहे. त्याचे त्यांच्या मते कारण असे की, 'स्वतला क्षणभर विसरून जाणे हे आनंदाचे गमक मानले तर तो आनंद सर्व कला सारख्याच प्राप्त करून देतील, पण कर्तृत्वाच्या दृष्टीने व कार्यव्यापाच्या दृष्टीने पहाता वाङ्मयकला ही अधिक पराक्रमी ठरते. जीवनाचे अगणित गुण व अगणित प्रकार यांचे प्रतिबिंब दाखवणे, हे अगणित वर्णसमूहरूप वाणीला व लेखनाला जसे साधेल तसे मर्यादित व्याप्तीच्या चित्रांना, गीतांना, मूर्तींना वा शिल्पकृतींना साधणार नाही.'
 यावरून असे दिसते की, मानवी जीवनाचा जास्तीत जास्त आविष्कार करण्याचे सामर्थ्य हेच त्यांच्या मते कलेच्या श्रेष्ठतेचे लक्षण होय साहित्यात ते सामर्थ्य असते म्हणून ते सर्व कलांत श्रेष्ठ होय.

 सौं. ७