पान:सौंदर्यरस.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
सौंदर्यरस
 

म्हणूनच हे लेखक आधुनिकतेचा पुरस्कार करतात. पण हा वर्ग म्हणजे केवळ आधुनिकातले विदूषक होत.'
 तात्यासाहेव स्वतः असे तीव्र व जळजळीत लिहीत नसत. पण नवमतवादातील अपप्रवृत्तीविषयी लिहिताना त्यांनी उतारे मात्र तसे दिले आहेत, व त्यांतूनच आपला अभिप्राय व्यक्त केला आहे.
 नव्या मानसशास्त्रामुळे आणखी एक परिणाम त्यांच्या मते होतो तो असा की, त्यामुळे वाङ्मय दुर्बोध होते. ते म्हणतात, 'अलीकडे सामुदायिक अनुभवापेक्षा व्यक्तिगत, फुटकळ अनुभवाला चित्ताकर्षकता येऊ लागली आहे. त्याचा एक परिणाम असा होतो की, अशा प्रकारचे नवे वाङ्मय सर्वांना सारखेच समजत नाही. संकीर्ण सामुदायिक अनुभव हा कळतो, समजतो, तसा विशेष व्यक्तिगत व कदाचित् अपवादात्मक ठरणारा अनुभव कळत नाही. यामुळे नवीन वाङ्मयाचा चेहरा व मोहरा ही दोन्ही सहजच बदलतात.'
 नवमतवादी लेखकांना समाजाला धक्का देण्यात भूषण वाटते. त्याविषयी लिहिताना तात्यासाहेब म्हणतात, 'विजेने दिलेला लहानसा धक्का दुःखदायक न वाटता आनंदकारकच वाटतो. त्याने काही रोगही बरे होतात. पण तापलेल्या पदार्थाने दिलेला डाग हा कितीही लहान असला तरीही दुःखदच होणार. तीच गोष्ट नवमत प्रगट करण्याच्या पद्धतीची समजावी. एकाच शब्दात सांगायचे तर नवमतवादी लेखकांनी सदभिरुची संभाळली पाहिजे.'
 इंग्लंडमध्ये त्या काळी सदभिरुचीचे उपासक तेथल्या नवमतवादी वाङ्मयाच्या हीन अभिरुचीवर टीका करू लागले होते. त्याची कल्पना यावी म्हणून तात्यासाहेबांनी फिलिप हेंडरसन याचा उतारा दिला आहे. तो म्हणतो, 'हल्ली नाटक म्हणजे हिडिस लैंगिक अनाचार पहाण्याची एक संधी, असाच अर्थ झाला आहे. पुन्हा पुन्हा तोच तो व्यभिचार हा एकसुरी विषय त्यात असतो.'
 तात्यासाहेबांनी हे लिहिल्याला आता तीस-पस्तीस वर्षे होऊन गेली आहेत. तेवढ्या अवधीत सर्व मराठी वाङ्मय असे नवमतवादी झाले आहे