पान:सौंदर्यरस.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जीवनाचे भाष्यकार तात्यासाहेब केळकर
९५
 

 नवमतवादावर विशेष प्रभाव होता तो नव्या मानसशास्त्राचा. हे नवे मानसशास्त्र म्हणजे फ्रॉइडचे मानसशास्त्र होय. मनुष्याच्या विचारस्वातंत्र्याला या मानसशास्त्राने फार मोठा धक्का दिला होता. मनुष्यप्राणी जे जे करतो ते ते त्याच्या पूर्ववासनांच्या जोराने, पराधीनतेने करतो, स्वाधीनतेने करीत नाही, असे फ्रॉइडने सांगितले होते, हे प्रसिद्धच आहे. साहजिकच मनुष्य पराधीन म्हटला म्हणजे मग त्याला सद्गुणी म्हणण्यात तरी काय स्वारस्य ? कारण सद्गुण हा ऐच्छिक व जाणता असला तरच त्याची महती. याचा परिणाम असा झाला की, भावनेत स्वारस्य नाही व सद्गुण म्हणजे थोतांड आहे, अशी विचारसरणी लेखकांत रूढ झाली आणि तीच वाङ्मयात दिसू लागली.
 या मानसशास्त्राचे साहित्यावर प्रत्यक्ष परिणाम काय होऊ लागले, हे तात्यासाहेबांनी त्या वेळच्या 'नवमत' नावाच्या मासिक पुस्तकातला एक उतारा उद्धृत करून सांगितले आहे : लैंगिक स्वातंत्र्य म्हणजेच नवमतवाद अशी समजूत करून घेऊन काही अर्ध्याकच्च्या गुरूंच्या चेल्यांनी समाजाचा बुद्धिभेद चालवला आहे. नवमतवाद म्हणजे स्वैरसंचार असाच नवमतवादाचा प्रांजळ अर्थ सर्रास रूढ होत असल्याने बऱ्याच विचारवंतांचा नवमतवाद म्हणजे प्लेगचा उंदीर अशी भीती वाटल्यास त्यात त्यांचा दोष काय ? शेजेची राणी सोडून शेजारणीवर डोळा ठेवण्यात काही चूक नाही, असे नवमतवाद मानतो आणि पितृत्व हे केवळ तर्कसिद्ध आहे, असे म्हणून प्रत्यक्ष आईचाही संशय घ्यायला हरकत नाही, असेही त्याला वाटते.'
 आणखी इतर लेखकांचेही नवमतवादाचे स्वरूप स्पष्ट करून त्याचा निषेध करणारे उतारे तात्यासाहेबांनी दिले आहेत. लैंगिक विषयावरील क्रान्तिकारक मते प्रतिपादन करीत असताना, लिंगविषयक अज्ञानामुळे किंवा लैंगिक कोंडमाऱ्यामुळे मानवी सुधारणेची पीछेहाट होते, म्हणून तशा विषयावर निर्लज्जपणे काहीही लिहिले बोलले की, मानवी स्वभावात चावटपणाची जी अधम आवड आहे, ती जागृत होऊन लोकांना धक्के बसतात व मजा पहायला मिळते, या हेतूने हे लोक नवमताचा पुरस्कार करतात. जगावेगळे काही तरी केले की, लोक आश्चर्य चकित होऊन टाळया पिटतात.