सेनानायक तुम्हा पाहुनी वीर मावळे जमले ।
स्त्रिया तरुण आबाल वृद्धही उत्साह सरसरले ॥ २ ॥
सत्याग्रह सत् युद्ध (सद्युद्ध) युक्त हे सुपिक देश राखाया ।
पुकार केली कुंड पेटलें भरवीले चैतन्या ॥ ३ ॥
जिल्हापरिषद बारामतिला विषय निघाला पुढती ।
पगडीच्या झिरमिळ्या फिरविल्या गभीर मंडुक वृत्ति ॥ ४
रण संग्रामा तोंड लागता सेनानाथ पळावा ।
रिपू चिरितसे त्या सेनेला असा समय कां यावा ॥ ५ ॥
पाठ दाविता तुम्ही शत्रु तो थयथय नाचत आला ।
स्त्रिया पुरुष सर्रास घेरिले तुरुंग दावायाला ॥ ६ ॥
खाइ पेटली पडति पटापट एकामागे एक ।
कच्ची बच्ची थोर विभूती बुद्धिविशारद लोक ॥ ७ ॥
सक्त मजूरी दगड फोडितां चळवळ रक्त वहातें ।
घाण्याखाली मान मोडली कसें तुम्हा बघवे तें ॥ ८ ॥
शरीर उघडे फटके घेतें चमडे लोंबत राही ।
रक्त मांस बाहेर निघावें शिव शिव निर्घृणता ही ॥ ९॥
या परता घ्या स्वतां निजकरीं घोर नग्न तलवार ।
चिरा चराचर देशबांधवां लावा जगतापार ॥ १० ॥
अपमानाचें शल्य बोंचतें सूड घेतसा पुरता ।
की कैदेचें चित्र भयानक थरथरवीतें चित्ता ॥ ११ ॥
स्वयें कथियलें कौन्सिलावरी बहिष्कार घालावा ।
उलट घेउनी कां पलटविता धरसोडीचा कावा ॥ १२ ॥
स्वतां न जातां कौन्सिलांतरी उपदेशिन जनतेला ।
कृष्ण प्रतिज्ञा भंगे कां कुणि भीष्म येत युद्धाला ॥ १३ ॥
दिवाण होउनि पीळ मिशाचा भिडवा डोळ्याखाली ।
जन्माचें सार्थक्य होऊं द्या स्वार्गि घाट घणघणली ॥१४॥