पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या स्वयंसाधनेत आपल्या 'स्व' कडून मार्गदर्शन घ्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येक आसनातील ऊर्जाचक्राकडे लक्ष द्यायचे आहे. ऊर्जाचक्रांचे स्वरुप दोन प्रकारचे असते. एक लौकिक, दुसरे अलौकिक किंवा प्राकृतिक-आध्यात्मिक किंवा व्यावहारिक आणि सैध्दांतिक ऊर्जाचक्रांचे आपल्या शरीरातील स्थान निश्चित करणे, ते स्थान पकडणे, सूर्यनमस्कार घालतांना ते वापरणे याचाच आपण विचार करणार आहोत. प्रत्यक्ष सरावासाठी शरीरात असलेल्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देणार आहोत. या सुविधा वापरून साधनेत सातत्य कसे टिकवता येईल याकडे लक्ष देणार आहोत. ऊर्जाचक्रांचे आध्यात्मिक स्वरुप आपल्या कक्षेत येत नाही. ते स्वरूप फार गहन आहे. शरीराचे अस्तित्व संपल्यावर या ऊर्जाचक्रांचे काय होते हा एक अलौकिक स्वरुपाचा अभ्यास विषय आहे. म्हणून फक्त लौकिक स्वरुपाचाच विचार करणार आहोत. त्यातही शरीरस्तरावर प्रत्यक्ष अनुभूती मिळते अशा प्रकाराकडेच फक्त लक्ष देणार आहोत. शरीर स्तरावर कोणताही त्रास न होता साधनेमध्ये सातत्य टिकविणे, हे साधकाचे आदि आणि अंतिम ध्येय असते. अतूट श्रद्धा असेल तरच साधना अखंडितपणे सुरू ठेवता येते. यासाठी ऊर्जा चक्रांकडे लक्ष द्या. त्यांच्या आज्ञा- सूचना पाळा. उपासना सिद्ध होण्यासाठी अधीर होऊ नका. खात्री बाळगा आज नाही उद्या तुम्हाला सूर्यनमस्काराचे सर्व फायदे मिळणार आहेत. कारण उर्जाचक्र हे जीवात्म्याचे, आत्मारामाचे प्रथम प्रतिनिधी आहेत. या स्वयं साधनेमध्ये तोच तुमचा मार्गदर्शक सद्गुरू आहे. या आत्मारामाचे दास होण्याचा सातत्याने प्रयत्न करा. रामदास व्हा. आत्मतेज वाढवा, मरूतगणात सामील होऊन 'जितेंन्द्रियम बुद्धिमतांमवरिष्ठम्' व्हा. मनाची शते ऐकता दोष जाती। मती मंद ते साधना योग्य होती। चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी। म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी ।। मनोबोध - २०५ या कार्यपुस्तिकेतून प्रत्यक्ष सूर्यनमस्कार कसे घालायचे याचे प्राथमिक मार्गदर्शन होणार आहे. पण ते महत्वाचे नाही. कारण सूर्यनमस्कार घालण्याच्या पध्दतीमध्ये अनेक प्रकार आहेत. सूर्यनमस्कार आहेत तसेच चांद्रनमस्कार आहेत. समंत्रक सूर्यनमस्कार, बीजमंत्रासहीत घातलेले सूर्यनमस्कार, हंसकल्प सूर्यनमस्कार, सूर्यनमस्कार एक साधना vii