पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्व या शब्दाचा दुसरा अर्थ आहे आत्मा किंवा आत्माराम हा जीवात्मा म्हणजेच परमतत्त्व आहे. ते परमेश्वराचे पूर्णरूप आहे. विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे. या ‘स्व’ मध्ये रममाण होणारा, त्याची सातत्याने पूजा करणारा तो स्वस्थ. आत्मारामाशी सततचे अनुसंधान जो ठेवतो तो नित्यानंदी असतो. हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. शरीरामध्ये जीवात्मा आहे म्हणून जीवन प्रवाही आहे. शरीराचे पतन झाल्यास जीवात्मा पंचतत्त्वात विलीन होतो. एक राम आहे, दुसरा राममय झालेली रामी आहे. एकाशिवाय दुसऱ्याचे अस्तित्व शून्य आहे. याच अर्थाने सूर्यनमस्कार ही स्वयं साधना आहे. स्वत:च्या शरीराने केलेली स्वयं ची उपासना आहे. आत्मारामाची उपासना आहे. आत्मतेज वाढविण्यासाठी केलेली साधना आहे. सूर्यनमस्काराची साधना करतांना 'स्वयं'च्या अध्यापनाचा पाठ दररोज नित्यनेमाने मिळतोच. साधकाच्या भूमिकेतून हे अध्ययन थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न या कार्यपुस्तिकेमध्ये केलेला आहे. तो एकदा वाचा-बघा आणि विसरून जा. आदिकालापासून सुरू असणाऱ्या सूर्योपासनेच्या प्रवाहात उडी घ्या. प्रवाहामध्ये सामिल झाल्यावर आपोआप पोहता येते. पोहणे येण्यासाठी पुस्तकातील पाठ वारंवार वाचण्याची अजिबात आवश्यकता नाही. ही कला 'जीवनदायी' आहे, 'अकालमृत्यूचे हरण' करणारी आहे, एवढे मनावर ठसले म्हणजे पुरेसे आहे. सूर्यनमस्कार नित्यकर्म साधना मनाने मनावर घेण्यासाठी बुद्धीचा आधार आवश्यक आहे. स्वयं हा 'ब्रह्मानंदम् परमसुखदम्' आहे. तो 'केवलं ज्ञानमूर्ती’ आहे. तो सर्वज्ञ आहे. पण विस्मृतीत गेलेल्या काही शाश्वत तत्त्वांची आठवण बुद्धीला आज करून द्यायची आहे. मन-बुद्धी एक झाल्यावर शरीराला कोणतीच गोष्ट अशक्य नसते. मात्र 'उपासकाशी सूचना, उपासना उपासना' या न्यायाने सूर्यनमस्काराची साधना अखंडितपणे सुरू ठेवणे गरजेचे असते. आपली सर्वांची सूर्यनमस्कार साधना नियमितपणे होण्यासाठी मी केलेला हा एक अल्पसा प्रयत्न आहे. अल्प या विशेषणाचा अर्थ अपूर्ण असाही आहे. प्रचिती तीन प्रकारची असते, शास्त्रपतिती, गुरूप्रतिती, आत्मप्रतिती. या तीनही स्तरावर माझी प्रगती अपूर्ण आहे, अल्प आहे. हा माझा प्रयत्न आदर्श सूर्यनमस्कार घालण्यासाठी फक्त पथनिर्देशक आहे. विचार आणि कृती यांना फक्त चालना देणारा आहे. सूर्यनमस्कार एक साधना VI