पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखकाचे मनोगत सूर्यनमस्कार सर्वांगीण व्यायाम आहे. ती एक ब्रह्मकर्मांतर्गत असलेली नित्यकर्म साधना आहे. स्वयं साधना आहे. सूर्यनमस्कार स्थूल शरीर व सूक्ष्म चैतन्य यांची पूजा आहे. सूर्यनमस्काराला धार्मिक अधिष्ठान आहे. धार्मिक अधिष्ठान म्हणजेच नैसर्गिक गुणधर्म, नैसर्गिक न्याय तत्त्व. जसे पाण्याचा नैसर्गिक गुण आहे थंड असण्याचा, अग्नीचा आहे उष्ण असण्याचा. अशुद्ध पदार्थ शुद्ध करण्याचा. दूध तापविले नाही तर खराब होणारच. प्रयत्न केला तर यश, नाही केला तर दारिद्र्य. हा नैसर्गिक न्याय आहे. सूर्यनमस्कारातील नैसर्गिक गुणधर्माची प्रचिती शरीर स्तरावर साधकाला लगेच मिळते. त्यातूनच शक्ती उपासनेची रोकडा प्रचिती दररोज अनुभवता येते. या दररोजच्या अनुभवातून ही स्वयंची साधना हळू हळू उलगडत जाते. मानसिक ताण-तणाव, भय, दुःख, शोक, चिंता, विवंचना याचे दुसरे नाव प्रज्ञापराध. यामुळे शरीर, मन, बुद्धी यावर विपरीत परिणाम होतात. रोग, व्याधी, व्यसन, विकार सुरू होतात. सूर्यनमस्कार स्वयं साधनेचा प्रभाव स्थूल व सूक्ष्म शरीरावर सारख्याच प्रभावाने होतो. शरीर, मन, बुद्धी यांचे शुद्धीकरण होऊन प्रज्ञापराधातून आपली मुक्तता होते. सर्वप्रकारचे भय-भ्रम यापासून सुटका होते. आपण खऱ्या अर्थाने 'स्वस्थ' राहतो. आपले आरोग्य आणि आनंद वर्धीष्णू राहते. 'स्वस्थ' हा शब्द अतिवापराने अर्थहीन झालेला आहे. त्याचा अर्थ बोथट झालेला आहे. स्व+असित म्हणजे स्व मध्ये रममाण असणारा. अशी या शब्दाची फोड करता येईल. स्व म्हणजे स्वतः किंवा स्वतःचे शरीर. या शरीराला आवश्यक असलेल्या पोषक/श्रेयस गरजा पुरवायच्या. त्याचे चांगल्या पद्धतीने भरण पोषण करायचे. शरीर आरोग्यपूर्ण ठेवायचे. त्याच्या माध्यमातून सर्व क्रिया-प्रक्रिया- ध्येय सिद्ध करायचे. असे करणारा स्वस्थ असतो. निवांत असतो. शांत असतो. समदोष: समग्निश्च समधातुमलक्रियः । प्रसन्नात्मेंद्रियमनाः स्वस्थइत्यभिधीयते ।। सुश्रुत सू. १५/४१ संपूर्ण स्वास्थ्याची व्याख्याच सुश्रुत सुक्तामध्ये आलेली आहे. दोष, धातू, मल, अग्नी यांच्या क्रिया सम असणे तसेच आत्मा, मन, इंद्रिय प्रसन्न असणे हे स्वास्थ्याचे, आरोग्याचे लक्षण आहे. सूर्यनमस्कार एक साधना