पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रत्येक आसन करतांना शरीराच्या कोणत्या भागाला ताण - दाब दिलेला आहे, तो किती प्रमाणात आहे, तो कोणत्या प्रकाराचा आहे आणि तो योग्य आहे किंवा नाही हे तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच सांगता येत नाही. चूक तुम्ही शोधायची आहे, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. सुधारणा तुम्हीच करायची आहे आणि प्रगती तुमचीच होणार आहे. या दृष्टीकोनातून सूर्यनमस्कार ही स्वयंसाधना आहे. हे स्वयंशिक्षण आयुष्यभर अखंडितपणे, दररोज, जोपर्यंत साधना सुरू आहे तोपर्यंत चालू असते. हे सातत्य टिकविण्यासाठी सूर्यनमस्कार साधनेकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन फार महत्वाचा आहे. सातत्यातून अनुभवाची प्रचिती येते. अनुकूल अनुभवातून श्रद्धा निर्माण होते. श्रद्धेतून नियमितपणा सातत्य आपोआप फुलते. अशातऱ्हेने श्रद्धा-सातत्य एकमेकांना पूरक आहेत. यापैकी एकाकडे जरी दुर्लक्ष झाले तरी तुमची साधना खंडित होण्याची भिती असते. मार्गदर्शन व अनुकरण यापासून शिक्षण प्रक्रिया सुरू होते. अध्ययन अध्यापन करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक, गुरू-शिष्य देणारा - घेणारा दोन्ही आवश्यक आहेत. देणारा आपले ज्ञान - अनुभव घेणाऱ्याला देतो आणि त्याच्यामध्ये अपेक्षित वर्तन परिवर्तन घडवून आणतो. स्वयंसाधनेमध्ये आपला 'स्व' उर्जाचक्राच्या माध्यमातून आपल्या शरीराला मार्गदर्शन करत असतो. त्याच्या सूचना लक्षात घेऊन सूर्यनमस्कारातील आसने केली नाहीत तर चांगलीच शिक्षा मिळते. स्नायू वेदना सुरू होतात. आज प्रात्यक्षिकांमध्ये आपण उर्जाचक्रांचे शरीरावरील नेमके स्थान, ते पकडायचे कसे, सूर्यनमस्कारामध्ये त्याचा वापर कसा करायचा याचा सराव करणार आहोत. सूर्यनमस्कार घालतांना हा स्व-अध्ययनाचा विचार आपण सहसा करत नाही. 'स्व'ने दिलेल्या सुचना दुर्लक्षित करतो. त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. सूर्यनमस्काराची अनुभूती योग्य पद्धतीने मिळत नाही. आपली साधना खंडित होते. काही दिवसांनी, महिन्यांनी अथवा वर्षांनी पुन्हा असाच प्रयत्न दुसऱ्यांदा सुरू होतो. कारण मला आणि तुम्हाला सर्वांनाच सूर्यनमस्काराने भूरळ घातलेली आहे. सूर्यनमस्कार श्लोक - मंत्र - तक्ता क्र. अकरा सूर्यनमस्कार एक साधना ११