पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-- चाफळ येथे राममंदिर पूर्ण झाल्यावर (सन १६४८) त्या ठिकाणी संप्रदायाची व पहिल्या मठाची स्थापना समर्थांनी केली. त्या अगोदर सहा-सात वर्षांमध्ये त्यांनी अकरा मारुती स्थापन केले आहेत. ज्या ठिकाणी मारुती स्थापन केले त्या परिसरात दुष्ट-जुलमी यवनसत्तेचे प्राबल्य होते. या प्रत्येक स्थानावरील मारुतीची आरती स्वतंत्र पणे समर्थांनी लिहिलेली आहे. यातील कोणतीही आरती नुसती वाचली तरी त्यामधील शब्द- अर्थ, ताल, लय, स्वर, ठेका, वेग आपल्यामध्ये वीरश्री निर्माण करते. समर्थ मारुतीमय झाले होते. त्यांनी मारुतीरुप धारण केले होते हे प्रकर्षाने जाणवते. खरी भक्ती त्या हो जगी मारुतीची। परी रामदासा असे मारुतीची। प्रत्येक रामदासीने मारुतीची उपासना करावी, बलोपासना करावी, अतःकरणात रामराज्याची स्थापना करावी. शरीरावर 'स्व' चे राज्य प्रस्थापित करावे, सर्व समाजात स्वराज्य निर्माण व्हावे या साठी समर्थांचा हा सर्व खटाटोप होता. समर्थांनी लिहिलेले (श्रीमारुती स्तोत्र) श्रीभीमरुपी स्तोत्र सर्वांना परिचित आहे. या स्तोत्राचा तेरा कोटी जप पूर्ण करण्याचा संकल्प श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड, यांनी केला होता. तो पूर्ण करण्यामध्ये विद्यार्थी वर्गाचा सहभाग फार मोठा होता. इतर विद्यार्थांनी आणि सूर्यनमस्कार साधकांनी श्रीभीमरुपी स्तोत्र दररोज म्हणावे यासाठी ते खाली देत आहे. समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे (नासिक, महाराष्ट्र) येथे फार मोठ्या संख्येने समर्थकालीन मौल्यवान हस्तलिखितांचे जतन केलेले आहे. त्यामध्ये समर्थांनी स्वअक्षरात लिहिलेले ग्रंथ, तसेच त्यांची स्वतःची काव्य निर्मिती यांचा संग्रह आहे. या संग्रहातील बाड क्रमांक १२७१ यामध्ये ८३ x २ = १६६ पृष्ठसंख्या आहे. त्यात अनेकविध विषय आलेले आहेत. त्यामध्ये 'श्रीसूर्यनमस्कार नामावळी’ असा एक कागद मिळाला. यामध्ये प्रचारात आहेत त्याहून अगदी निराळी सूर्यनमस्काराची बारा नावे दिलेली आहेत. दुसरे बाड क्रमांक १६३९ याची पृष्ठसंख्या आहे १५० x २ = ३०० यामध्ये नमस्कार त्या सूर्यनारायणासी हे ध्रुपद असलेले सूर्यस्तुतीचे बारा श्लोक आहेत. समर्थ वाग्देवता मंदिर यांचे सौजन्याने ‘श्रीसूर्यनमस्कार नामावळी' व बारा श्लोकांची सूर्यस्तुती जसे आहे तसे खाली देत आहे. सूर्यनमस्कार एक साधना ३२३