पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अपेक्षित लाभ स्थूल व सूक्ष्म शरीराला मिळतात याबद्दल शंका नाही. मानसिक उपासनेला कायिक उपासनेची जोड दिल्यास त्या साधनेची रोकडा प्रचिती दररोज अनुभवता येते. कायिक व मानसिक उपासनेचे संतुलन झाल्यास परिणाम तत्काळ अनुभवास येतात. समत्वं योगं उच्चते श्रीमद्भगवद्गीता. प्रत्येक उपासना ऊर्जा प्रदान करणारी आहे. प्रत्येकाला आपल्या क्षमतेप्रमाणे यातून शक्ती-सामर्थ्य आत्मसात करता येते. शरीर व मन यांच्या संतुलित सहकार्यातून शक्ती उपासनेत झपाट्याने प्रगती करता येते. या सामर्थ्याचा फायदा जसा व्यक्तीला तसाच समष्टिला होतो. परिणामी समाजाचे आरोग्य- शारीरिक व मानसिक- सुधारते. समाजाचा एकत्रित आत्मविश्वास वाढतो, मान जागृत होतो, देशाची समृद्धी वाढते, एकेक व्यक्तीगत प्रयत्नातून देश झपाट्याने प्रगती करतो. हे सर्व प्रत्यक्षात येण्यासाठी समाज धुरीणानी सूर्यनमस्कार/शक्ती उपासना यांचा अंगिकार करावयास हवा. त्याचा प्रचार प्रसार करावयास हवा. सर्व प्रकारच्या व्यवस्थापनेतून सूर्यनमस्कार साधनेचा सराव दररोज सक्तीने करून घेतला जावा. औषधाला शक्तीउपासनेची जोड दिल्यास रोगामधून त्वरित व कायमची मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे मंत्र जप उपासने बरोबर कायिक उपासनेचा पुरस्कार पुरोहित व ज्योतिषी यांनी करावा. अंघोळ झाल्यानंतर लगेच सूर्यनमस्कार त्यानंतर मंत्रजप वगैरे असा उपासनेचा विधी असावा. मंत्र विधीतून प्राणायाम व सूर्यनमस्कारातून योगासन यांचा सराव चांगला होतो. शरीरशक्ती व मनःसामर्थ्य यांची युती झाल्यामुळे संपूर्ण आरोग्य संवर्धनास सुरुवात होते. शरीर स्वस्थ असेल तरच चारी पुरूषार्थ सिद्ध होतात. अन्यथा दारिद्र्य, रोग, व्याधी, व्यसन यांच्या तावडीतून सुटका फक्त अकाल मृत्यूच करु शकतो. सूर्यनमस्कार विशेष आदि शंकराचार्यांचा प्रथम मठ, श्री शारदा पीठ, शृंगेरी (कर्नाटक) येथे ०६ ते १६ जानेवारी २०१२ मुक्कामाला होतो. हे पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी जगद्गुरूंचा आशीर्वाद घ्यावा हा उद्देश होता. पोहोचल्यावर लगेच जगद्गुरु श्री भारतीतीर्थ महास्वामी यांचे दर्शन घेतले. त्यांना या कार्यपुस्तिकेची अंतिम छापील प्रत सादर केली आणि त्यांच्या आशीर्वचनाची प्रार्थना केली. सूर्यनमस्कार एक साधना - २९५