पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठा मित्रपरिवार असणारी, स्वार्थी, संशयी असते. वाणिज्य व्यवसाय, हस्तकला यामध्ये यांना चांगली गती असते. सूर्य मीन राशीमध्ये असल्यास नेहमीचे राशीफळ प्रकर्षाने मिळतेच. त्याचबरोबर खाली दिलेले इतर लाभही होतात. जलक्रीडा, मोती व इतर जल संपत्तीचा परदेश व्यापार फलदायी असतो. या व्यक्ती शांत स्वभाव, परमेश्वरावर श्रद्धा, परोपकारी, संभाषण चतुर, विवेकशील असतात. बुद्धीमान, स्वप्रयत्नांवर विश्वास, प्रयत्नवादी असतात. सूचना राशिफल निश्चित करतांना रास- जन्मरास, रास + सूर्यग्रह / जन्मलग्न यांचा विचार प्रामुख्याने करतात. अनेकानेक गोष्टींचा विचार करून ग्रह-राशींचे फल निश्चित करतात. आजचा आपला पिंड मागील जन्मांच्या अनेकांच्या दैवाचा परिपाक आहे. आई-वडील, पिता-पत्नी, स्वकर्म, संततीकर्म इत्यादी अनेकांचे चांगले वाईट कर्म आपल्याला भोगायचे असतात. सध्या कोणते किंवा कोणाचे दैव बलवत्तर होऊन भोग भोगावे लागत आहेत याचा विचार न केल्यास सर्वच भाकिते अवास्तव ठरतात. मी स्वतः ज्योतिषी नाही, ज्योतिष शास्त्राचा अभ्यासकही नाही. सूर्यनारायण व ज्योतिषशास्त्र यांचा संबंध स्पष्ट करण्यासाठी या विषयावरील काही पुस्तके चाळली. त्यातील मला कळालेला भावार्थ माझ्या पद्धतीने आपणापुढे सादर केलेला आहे. - माझा उद्देश स्पष्ट आहे. हे विश्व सूर्यनारायण या प्रत्यक्ष देवाचे अंकित आहे. तो सर्व ब्रह्मांडाचा आत्मा आहे. ब्रह्मकर्मांर्तगत नित्यकर्म असलेल्या सूर्यनमस्काराची एका तपाची साधना सदगुरु समर्थ रामदास स्वामींनी टाकळी मठामध्ये नासिक येथे केली. आपली व्यक्तीगत साधना सार्वत्रिक करण्यासाठी बारा वर्षे भारत भ्रमण केले. बाराशे पेक्षाअधिक मठांची स्थापना केली. बलोपासनेच्या माध्यमातून भारतीयांच्या मनाची मशागत केली. त्यांची पराभूत वृत्ती फुंकून टाकली. आत्मतेजाचा अंगार फुलविला. संपूर्ण जगामधला हा एकमेव संत ज्याने शक्तीउपासनेतून अध्यात्मानंद व यशानंदाचा प्रसाद सर्वांना दिला. त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून साकार झालेले शब्द आहेत सकळ दोषांचा परिहार। करिता सूर्यास नमस्कार । स्फूर्ती वाढे निरंतर्। सूर्यदर्शन घेता।। श्रीमद् दासबोध १६.२ सूर्यनमस्कार एक साधना २९३