पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घालण्यापूर्वी किंवा साधना संपल्यावर शेवटी श्लोक म्हणतात. सूर्यमंत्र मात्र प्रत्यक्ष सूर्यनमस्कार घालतांना म्हटले जातात. (अधिक माहितीसाठी उत्तरार्धात दिलेल्या समंत्रक सूर्यनमस्कार या भागाचा संदर्भ घ्या.) साधनेच्या सुरूवातीला आपण जे श्लोक म्हणतो त्या मध्ये त्या देवतेला आवाहन करण्याचा भाव असतो. साधनेच्या शेवटी जे श्लोक म्हणतो त्यामध्ये समर्पणाचा भाव असते. आज केलेली साधना त्या देवतेनेच करून घेतलेली आहे. ही साधना त्या देवतेला अत्यंत प्रिय आहे. म्हणून आजची साधना तिला सर्वभावे अर्पण करतो. हा त्यामागे भाव असतो. हे श्लोक अनेक प्रकारचे आहेत. कारण सूर्योपासनेचे असंख्य प्रकार आहेत. गायत्री मंत्र किंवा संध्या विधी हे सूर्योपासनेचेच प्रकार आहेत. काही साधक सूर्यनमस्कार साधनेच्या शेवटी सूर्याष्टक किंवा आदित्यहृदय स्तोत्र किंवा इतर स्तोत्रे म्हणतात. काही साधक गायत्री मंत्राचे पठण करतात किंवा प्रातः संध्याविधी करतात. मुळात सकाळचा कालावधी कमी असतो. रात्री उशीरा झोपल्यामुळे तो अधिकच कमी होतो. सकाळच्या वेळेचे नियोजन करतांना व्यायाम व पूजाअर्चा यासाठी फारच थोडा वेळ देता येतो. अनेकांना हा थोडा वेळ सुद्धा फक्त सुटीच्या दिवशीच देता येतो. या कमी असलेल्या वेळेतही सूर्यनमस्कार कायिक साधनेला अधिक प्राधान्य द्यायचे आहे. वेळ आणि उद्देश यांची सांगड घालण्यासाठी साधकांसाठी कार्यपुस्तिका या भागात दिलेले आदी - अंत श्लोक पुरेसे आहेत. सर्वच संप्रदायामध्ये थोड्याफार फरकाने या श्लोकांचा वापर केला जातो. हे श्लोक साधकाचा आवाहन व समर्पण भाव जागविण्यासाठी पुरेसे आहेत. म्हणून किमान हे श्लोक प्रत्येक साधकाने अर्थ - उच्चार लक्षात घेऊन म्हणावे अशी अपेक्षा आहे. सूर्यमंत्र सूर्यनमस्कार घालतांना म्हटले जातात. सूर्यमंत्र उच्चारण, अर्थ व वैशिष्ट्ये लक्षात येण्यासाठी उत्तरार्धात दिलेल्या समंत्रक सूर्यनमस्कार या भागाचा संदर्भ घ्या. सूर्यनमस्कार साधनेमध्ये प्राणायामाचे सर्व फायदे मिळतात. सूर्यनमस्कारातील प्रत्येक आसनामध्ये श्वसन क्रिया अधिक सक्षम होते. प्रत्येक सूर्यनमस्कारामध्ये श्वसनाची दीर्घता वाढते. प्रत्येक आवर्तनामध्ये दीर्घश्वसनाची तीव्रता वाढत असते. त्यामुळे दम लागतो. धाप लागण्याचा संभव असतो. या सूर्यनमस्कार एक साधना २६१