पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जो करतो त्या साधकाची असते. तो ही जबाबदारी त्याच्या पद्धतीने पार पाडत असतो. कारण ती साधना त्याने स्वीकारलेली असते. त्याच्यावर कोणी लादेलेली नसते. हे साधन वापरण्याचे प्रशिक्षण साधना करतांना दररोज मिळत असते. प्रत्येकाची शिकण्याची क्षमता स्वतंत्र असते. त्या प्रमाणे त्याला कमी-अधिक अनुभवाचे गुण दररोजचे मिळत असतात. येणाऱ्या अनुभवांकडे त्रयस्थपणे, मन निर्विकार ठेऊन, दूर उभे राहून बघायचे असते. दुसऱ्या साधकाला आलेले अनुभव मला मिळावयास पाहिजे म्हणून कोणतीही साधना करायची नसते. म्हणूनच साधनेतील आपले अनुभव इतरांना सांगू नये असे म्हणतात. मध्यंतरीच्या काळात योगासनाच्या स्पर्धा महाविद्यालयात घेतल्या जायच्या. (सध्या त्या होत नाहीत अशी माझी माहिती आहे.) स्थिरसुखमासनम् । एखाद्या आसन स्थितीमध्ये स्थिर- शांत राहण्याची कमाल मर्यादा तीन तासांची आहे. याला त्या आसनातील आसनजय म्हणतात. आसनाची प्राथमिक स्थिती व आदर्श स्थिती यामध्ये कौशल्याचे अनेक टप्पे असतात. एका आसनातील कौशल्य - टप्प्याप्रमाणे आसनजयही अनेक असतात. आसन स्थितीचे परीक्षण किंवा निरीक्षण बाहेरून करता येत नाही. ओढून ताणून आदर्श आसन स्थिती करण्याचा प्रयत्न केला तर साधकाला निश्चितपणे त्रास होतो. आपल्या क्षमतेच्या निम्म्याने व्यायाम करावा असे म्हटले आहे. सूर्यनमस्कार साधनेच्या शेवटी आपण समर्पण श्लोक म्हणतो. अनेन सूर्यनमस्काराख्येन कर्मणा भगवान् श्रीसविता सूर्यनारायणः प्रियतां न मम ।। ॥ हरिः ॐ तत्सद् ब्रह्मार्पणमस्तु ।। या श्लोकामध्ये अनेन यथाशक्ती असा उल्लेख आपण करत नाही. याचे कारण स्पष्ट आहे. पहिला सूर्यनमस्कार घालतांना वापरलेली शारीरिक शक्ती व मानसिक सामर्थ्य शेवटच्या सूर्यनमस्कारापर्यंत तशीच टिकून राहावयास पाहिजे. थोडा दम लागला / धाप लागली की सूर्यनमस्कार घालणे बंद करा. ही त्यामागची सूचना आहे. सूर्यनमस्कार एक साधना २४४