पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सकाळी गरम तेल अंगाला चोळून गरम पाण्याने (सवय नसल्यास कोमट पाण्याने) अंघोळ करा. डोक्यावरून गरम पाणी घेऊ नका. कफदोषामुळे वरीलप्रमाणे त्रास होत असल्यास किंवा स्नायू दुखत असल्यास आराम पडेल. हा सर्व उपचार अन्नमय कोषासाठी. प्राणमय कोषासाठी प्राणायाम हा एकमेव उपचार आहे. सूर्यनमस्कार साधनेसाठी पूरक असलेले दीर्घश्वसनाचे (प्राणायामाचे) सर्व प्रकार आवश्य करा. त्यासाठी अधिक वेळ द्या. संदर्भ- साधकांसाठी कार्यपुस्तिका ( सूर्यनमस्कार दोन दिवस घातले नाहीत तरी चालतील.) प्राणायामाचे प्रशिक्षण या अगोदर घेतलेले नसल्यास फक्त वायूॐ नादॐ हे दोनच प्रकार साधारण पंधरा वीस मिनिटे करा. दीर्घ श्वसनाचा परिणाम मणक्यामधून गेलेल्या सर्व मज्जातंतूवर होतो. यामुळे मेरुदंडाचा नैसर्गिक आकार प्रस्थापित होण्यास मदत होते. मज्जातंतूच्या या जोडया सर्व शरीरात पसरलेल्या आहेत. त्यामुळे रक्ताभिसरणात सुधारणा होऊन स्नायूंचे दुखणे तसेच इतर तत्कालिक त्रास थांबतात. स्नायुंचे काणतेही दुखणे सुरू न होता अखंडितपणे सूर्यनमस्कार साधना सुरू ठेवणे हे आपले दररोजचे एकमेव उद्दिष्ट आहे हे लक्षात ठेवा. आसनामधील आदर्श स्थिती सिद्ध करण्यासाठी आतताईपणा करू नका. शरीरस्नायुंच्या कलाने घ्या. त्यांच्यावर जोर-जबरदस्ती लादू नका. सूर्यनमस्कार अखंडितपणे दीर्घ काळ श्रद्धा-सबुरीने घातल्यास या साधनेचे सर्व फायदे आपल्याला मिळणार आहेत हे लक्षात ठेवा. शिंका येणे, डोके दुखणे या विकारात तीन दिवसात संपूर्ण आराम मिळावयास हवा. असे झाले नाही तर डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्या. आपण स्वतःवर केलेले उपचार व त्यातील अनुभव मुद्दाम कळवा. ते इतरांना मार्गदर्शक ठरणार आहेत. कृपया संपर्कात रहा. प्रश्न- अ) सूर्यनमस्कार बरेच दिवस घालतो आहे. पण हस्तपादासन हे आसन चांगले जमत नाही. कपाळ गुडघ्याला लागत नाही. या आसनाचा सराव करण्यामध्ये सूर्यनमस्कार एक साधना २३८