पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मणिपूर चक्राला (नाभीप्रदेश) ताण पडेल, त्रास होईल असा ताण - दाब देऊ नका. या प्रकारातील आसनांचा सराव करू नका. पुढील सूर्यनमस्कार घालतांना चूक झालेल्या आसनातील ताण- दाबाच्या विरूद्ध ताण-दाब असलेले आसन व्यवस्थित हळुवारपणे करण्याचा प्रयत्न करा. दुखणा-या स्नायूंना लगेच आराम वाटेल. (असे न झाल्यास चूक शोधण्यात काहीतरी गफलत झालेली आहे हे नक्की समजा. पुढील आसन प्रकारामध्ये चूक सापडते कां हे बघा.) मेरुदंडाला त्रास होईल अशा काही तुमच्या अयोग्य सवयी असल्यास त्यामध्ये सुधारणा करा. उदाहरणार्थ- ऑफिसमधील टेबल-खुर्चीत बसल्यावर टेबलाची उंची कोपराच्या थोडी खाली असली पाहिजे. कॉम्प्युटरचा स्क्रिन थोडा तिरका, डोळ्याच्या सरळ रेषेत पण थोडा खाली राहील असा पाहिजे. झोपण्याची गादी फार जाड, अतीमऊ असल्यास मेरुदंडाच्या नैसर्गिक आकारास बाधा येते. सरळ जमिनीवर दोन-तीन कांबळे टाकून त्यावर झोपा. मोटारसायकल चालवतांना मेरुदंडाला होणारा त्रास किंवा कार ड्रायव्हिंग करतांनाची बैठक यामध्ये योग्य त्या सुधारणा करा. आपले उपचार योग्य आहेत याची पावती लगेच त्याच वेळी त्याच दिवशी मिळते. स्नायुंचे दुखणे ७०/८०% कमी होते. हा अनुभव न आल्यास तीन दिवस शरीराला पूर्ण विश्रांती द्या. कोणताही व्यायाम करू नका. मेरुदंडाचा नैसर्गिक योग्य आकार म्हणजे आपले आरोग्य. या आकारामध्ये काही बाधा आल्यास शरीर यंत्रणा दोन-तीन दिवसात तो पुन्हा प्रस्थापित करते. तीन दिवसात स्नायूंचे दुखणे पूर्णपणे थांबले नाही तर डॉक्टर कडे जाऊन उपचार घ्या. त्यांचा सल्ला घेऊन सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करा. सूर्यनमस्कार अखंडितपणे दीर्घ काळ श्रद्धा - सबुरीने घातल्यास या साधनेचे सर्व फायदे आपल्याला मिळणार आहेत हे लक्षात ठेवा. आपण स्वतःवर केलेले उपचार व त्यातील अनुभव मुद्दाम कळवा. ते इतरांना मार्गदर्शक ठरणार आहेत. संपूर्ण आरोग्याची हमी फक्त पंधरा मिनिटांमध्ये दररोज. सूर्यनमस्कार एक साधना २२७