पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूजा करतांना देवांना आपण स्नान घालतो तेंव्हा श्लोक म्हणतो शुद्धोदकं समर्पयामि। उष्णोदकं समर्पयामि || याच प्रकारे आपणही अंघोळ करावी. उष्ण व थंड प्रकारच्या शेकाने शरीरातील प्रत्येक पेशी अकुंचन-प्रसरण पावते. पेशीकेंद्रात असलेल्या अवकाशाचा संपर्क अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाशी येतो. सकाळच्या वातावरणाचा प्रभाव शरीरामध्ये भिनतो. आपल्याला ताजेतवाने वाटते. अंगात उत्साह संचारतो. मन सुबुद्ध होते. अंघोळ पेशींना कार्य करण्यास प्रवृत्त करतात. अंघोळीचे श्रम आजारपणात झेपत नाहीत. म्हणून अंगात थोडी ताकद आल्यावर अंघोळ करण्याचा सल्ला डॉक्टर रुग्णांना देतात. प्रत्येक पेशीला या प्रकारचे अभ्यंग (मसाज) मिळाल्याने स्नायुंची लवचिकता वाढते. एक दिवस अंघोळ करून सूर्यनमस्कार घाला दुसऱ्या दिवशी अंघोळ न करता घाला तुम्हाला दोन्ही मधील फरक लगेच लक्षात येईल. सूर्यनमस्कार स्थूल शरीर व सूक्ष्म चैतन्याची पूजा आहे. ती एक साधना आहे. शुचिर्भूत होऊन ही उपासना करणे चांगले. ब) सूर्यनमस्कार घातल्यानंतर अंघोळ करून दिवसाच्या कामाला सुरुवात केलेली चांगली असे वाटते. कृपया मार्गदर्शन करावे. सूर्यनमस्कार घालतांना घाम येतो. घामातून विजातीय द्राव बाहेर टाकला जातो. अंघोळ झाल्यावर त्वचा गार असते व श्रमाने शरीरातील उष्णता वाढते. घामाचा संपर्क हवेशी येऊन शरीराची उष्णता स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होतो. ही एक उपचार पद्धती आहे. अंगाला घामाचा उग्र दर्प येत असल्यास खाण्या- पिण्यातील पथ्यपाणी सांभाळा, रात्री झोपतांना रेचक घ्या. सकाळी अंघोळ झाल्यावर चांगला घाम येईपर्यंत सूर्यनमस्कार घाला. एका आठवड्यात घामाचा उग्र दर्प कमी होईल. अंगाला घाम येईपर्यंत व्यायाम करा. घाम शरीरात जिरू द्या. व्यायाम झाल्यावर घशाला कोरड पडल्यास कोमट पाणी घ्या. चहा चालेल. गार पाणी किंवा थंडपेय चालणार नाहीत. इत्यादी सूचना सर्वांच्या परिचयाच्या आहेत. सूर्यनमस्कार एक साधना २१०