पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्यावी यासाठी त्याचा आशीर्वाद घ्यावयाचा आहे. या आसनामध्ये त्याला वंदन करावयाचे आहे. प्रणामासन ॐ अर्काय नमः अर्क या शब्दाचा अर्थ काढा- अग्नीच्या उष्णतेत आटवून केलेला काढा, एखाद्या गोष्टीचे सार. औषधी द्रव्य आटवून त्याचा परिणाम शतगुणीत केला जातो तो औषधी काढा. सूर्याला रसाधिपती म्हणतात. विश्वात असलेल्या सर्व प्रकारच्या रसांची उत्पत्ती, साठवणूक व पुरवठा करणारा हा प्रत्यक्ष दृग्गोचार होणारा देव आहे. जमीन-पाणी-वायू यातील रसद्राव हाच सजीवांचा जीवनरस आहे. आयुष्य कसे जगावे याचे सारभूत उदाहरण म्हणजे हा प्रत्यक्ष सूर्यार्क होय. यशस्वी आयुष्याचा मार्ग तो आपल्याला अखंडितपणे सदासर्वदा दाखवित असतो. सूर्यदेवता ज्ञानविज्ञान, व्यवहार यांचा प्रत्यक्ष वस्तुपाठ आहे. त्याच्या ज्ञानप्रकाशाने आपले अस्तित्व उजळून निघते. या ज्ञानसूर्याच्या उपासनेतून भयमुक्त संपन्न आयुष्य प्राप्त होते. अहोरात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विश्वातील संपूर्ण चल-अचल सृष्टीच्या योगक्षेमाची निरपेक्षपणे काळजी घेणारा हा ज्ञानसूर्यप्रकाश आहे. हे सर्व व्यापक, सर्व समावेशक कार्य ही त्याची सहज प्रवृत्ती आहे. तो स्वत: या ज्ञानसूर्यप्रकाशाबद्दल अनभिज्ञ आहे. हे त्याचे अलौकिक कार्य करूनही न केलेले 'अकर्म' आहे. तो त्याच्या कार्यात गुंतून राहत नाही. आपल्या कार्याच्या अलौकिकतेची त्याला गंधवार्ताही नसते. प्रत्यक्षात सूर्यनारायण कायिक, वाचिक, मानसिक सर्व क्रियांचा कर्ता, करविता, करण्यास प्रेरणा देणारा आहे. फुलांमधून मधमाशा मध गोळा करतात पण या मधात फुले नसतात. याप्रमाणे सूर्यनारायण आपल्या कर्माच्या परिणामांबद्दल उदासीन, विरक्त असतो. सूर्यनारायण यशस्वी आयुष्याचा वस्तुपाठ आहे. प्रत्यक्ष व्यवहारात त्याच्याप्रमाणे वागणे फार कठीण आहे. पण हाच एकमेव मार्ग आहे ज्यातून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. आपले आयुष्य यश आनंद कीर्ती याने उजळून निघणार आहे. या आसनामध्ये अर्कनारायणाकडे मागणे मागावयाचे आहे. त्याची शिकवण प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा द्यावी म्हणून आशीर्वाद मागावयाचा आहे. त्याला मनोभावे नमस्कार करावयाचा आहे. सूर्यनमस्कार एक साधना १९३